Allu Arjun Arrest: 'पुष्पा 2' चित्रपटामुळे संपूर्ण देशभरात चर्चेत असलेल्या दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun) अडचणी वाढल्या आहेत. हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad Police) अल्लू अर्जूनला (Allu Arjun) अटक केली आहे. संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली आहे. अल्लू अर्जूनला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून बेड्या ठोकल्या आहेत. कोर्टात हजर करण्यात आलं असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान अल्लू अर्जूनने यावर आक्षेप नोंदवला आहे. 


अल्लू अर्जूनने नोंदवला आक्षेप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार, अल्लू अर्जूनने आपल्याला ज्याप्रकारे अटक करण्यात आली त्यावर आक्षेप नोंदवला आहे. पोलिसांनी आपल्याला नाश्ता पूर्ण करु दिला नाही असं अभिनेत्याचं म्हणणं आहे. तसंच आपल्याला थेट बेडरुममधून उचललं असाही दावा केला आहे. आपल्याला कपडे बदलण्याची संधीही दिली नाही असं अल्लू अर्जूनचं म्हणणं आहे. पण समोर आलेल्या व्हिडीओत अभिनेता लिफ्टमध्ये जाताना दिसत आहे. सुरुवातीला अल्लू अर्जून साध्या टी-शर्टमध्ये दिसत असून, नंतर हुडी घातलेली दिसत आहे. या हुडीवर फ्लॉवर नही, फायर है असं लिहिलेलं आहे. 


व्हायरल होतोय अभिनेत्याचा व्हिडीओ


अल्लू अर्जूनच्या अटकेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अल्लू अर्जूनच्या अवतीभोवती गर्दी दिसत आहे. अल्लू अर्जूनने या व्हिडीओत सफेद रंगाचा टी-शर्ट घातला आहे. या टी-शर्टवर हिंदीत 'फ्लॉवर नही, फायर है' असं लिहिलं होतं. व्हिडीओत अभिनेता चहा पिताना दिसत आहे. यावेळी त्याची पत्नी स्नेहा रेड्डी अटक होत असल्याने चिंताग्रस्त दिसत आहे. यावेळी अल्लू अर्जून पत्नीला समजावतो. चहा संपवल्यानंतर अभिनेता पोलिसांसह त्यांच्या गाडीत बसून निघून जातो. पोलिसांनी अल्लू अर्जूनचा अंगरक्षक संतोष यालाही अटक केली आहे. 



अल्लू अर्जूनविरोधात कोणत्या कलमांगतर्गत गुन्हा दाखल?


अभिनेत्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला हैदराबादच्या चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात नेले. या प्रकरणासंदर्भात अभिनेत्याची येथे चौकशी केली जाणार आहे. अभिनेत्याचे सासरेही येथे पोहोचले आहेत. पोलिसांनी अल्लू अर्जुनलाही वैद्यकीय चाचणीसाठी नेलं. तक्रारीच्या आधारे, अभिनेता अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



अल्लू अर्जूनला अटक का केली आहे?


हैदराबादमधील संध्या थिएटर येथे 4 डिसेंबर रोजी संध्याकाळी 'पुष्पा 2' चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आली होती. अल्लू अर्जुन त्याचा चित्रपट पाहण्यासाठी येथे येणार असल्याचे सांगण्यात आलं  होतं. अशा परिस्थितीत आपल्या आवडत्या स्टारला पाहण्यासाठी चाहत्यांची थिएटरबाहेर मोठी गर्दी जमली होती. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. या गर्दीला भेटण्यासाठी अल्लू अर्जुन अगदी शेवटी पोहोचला. अभिनेत्याला पाहण्यासाठी लोकांनी धाव घेतली आणि चेंगराचेंगरी झाली. याचे अनेक व्हिडिओ हैदराबादमधूनही समोर आले होते, ज्यामध्ये अल्लूच्या कारभोवती लोकांची गर्दी जमलेली दिसत होती.


या गर्दीत एक मुलगा बेशुद्ध झाला होता, तर एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. 'पुष्पा 2' पाहण्यासाठी ही महिला कुटुंबासह आली होती. अपघातानंतर काही दिवसांनी अल्लू अर्जुनने व्हिडिओ शेअर केला. या संपूर्ण प्रकरणावर त्याने पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रियाही दिली. अल्लू अर्जुन म्हणाला होता, 'संध्या थिएटरमध्ये जी दुर्घटना घडली ती घडायला नको होती. मी संध्याकाळी थिएटरमध्ये गेलो. मी पूर्ण सिनेमा पाहू शकलो नाही, कारण त्याच क्षणी माझ्या मॅनेजरने मला सांगितले की खूप गर्दी आहे, आपण येथून निघायला हवं".