मुंबई : टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल नवलानी याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी राहुलविरुद्ध लूकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. पोलिसांनी राहुल नवलानीला इंदूर येथून अटक केली आहे. रविवारी 29 वर्षीय टीव्ही अभिनेत्री वैशालीने इंदूरमध्ये राहत्या घरी आत्महत्या केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणी राहुल नवलानीच्या अटकेला पोलिस आयुक्त हरी नारायण चारी यांनी दुजोरा दिला आहे. व्यवसायाने व्यापारी असलेल्या राहुलला इंदूरमधूनच अटक करण्यात आली आहे. वैशालीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल राहुल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ (आत्महत्येसाठी प्रवृत्त) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी वैशालीची सुसाईड नोटही पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली आहे. सुसाईड नोटच्या आधारे वैशाली प्रचंड तणावात होती आणि राहूल नवलानी तिचा छळ करत असल्याचं सांगितलं आहे.


आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वैशालीच्या आत्महत्येनंतर राहुल आणि त्याची पत्नी परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. राहुल वैशालीला धमकावत असे आणि वैशालीचे फोटो व्हायरल करण्याची धमकीही देत ​​असे, अशी माहिती वैशालीचा भाऊ नीरज ठक्करने पोलिसांना दिली होती.


अभिनेत्रीच्या भावानेही राहुलवर तिचं लग्न मोडल्याचा आरोप केला होता. राहुल हा व्यवसायाने व्यापारी आहे. त्याच्याकडे अभिनेत्रीचे फोटो होते, ज्याद्वारे तो वैशालीला ब्लॅकमेल करायचा आणि ते फोटो तिच्या होणाऱ्या नवऱ्यालाही पाठवले होते.


सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं होतं?
रिपोर्टनुसार, वैशालीने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की,  I quit maa. आई लव्ह यू पापा माँ. मी वाईट मुलगी झाली असेन तर मला माफ करा. कृपया राहुल आणि त्याच्या कुटुंबियांना शिक्षा करा. राहुल आणि दिशा यांनी अडीच वर्षांपासून माझा मानसिक छळ केला. अन्यथा माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तुला माझी शप्पथ आहे कृपया तु खूश राहा.  मी तुमच्यावर खूप प्रेम करते. मितेशला सांग मला माफ कर.