सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरील वादावर राज ठाकरेंची भूमिका
काय म्हणाले राज ठाकरे...
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूते १४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.सुशांत गेल्या काही महिन्यांपासून नैराश्याचा सामना करत होता. असं असतानाच घराणेशाहीमुळं त्याच्या कारकिर्दीत एक अनपेक्षित टप्पा आल्याचंही बोललं गेलं. दरम्यान ज्या कलाकारांवर अन्याय होत असेल त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा अशी काही वृत्त प्रसारित करण्यात आली. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत भूमिका स्पष्ट केली आहे.
ते म्हणाले, “सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत वाद उसळला आहे आणि माध्यमातील काही घटकांकडून त्या वादाचा संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडला आहे. या वादाच्या अनुषंगाने यापुढे कलाकारांवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा अशा आशयाच्या बातम्याही काही ठिकाणी प्रसारित झाल्या. मी इथे स्पष्ट करु इच्छितो, या वादाचा आणि माझ्या पक्षाचा किंवा पक्षाच्या इतर कोणत्याही शाखेचा कुठलाही संबंध नाही. याची संबंधितांनी नोंद घ्यावी. धन्यवाद”
घराणेशाहीमुळे स्टार किड्सवर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका होत आहे. शिवाय सलमान खान, करण जोहर आणि एकता कपूर देखील सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. घराणेशाहीच्या वादामुळे सोशल मीडियावर अनेक स्टारकिड्सच्या फॉलोअर्सची संख्या देखील कमी झाली आहे.