मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल अपमानास्पद ट्विट केल्याबद्दल चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार सुभाष राजोरा यांनी वर्मा यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामगोपाल वर्मा यांचे ट्विट हे आक्षेपार्ह, घृणास्पद आणि  द्वेषयुक्त होते. रामगोपाल वर्मा यांचा उद्देश मुर्मू यांची प्रतिमा आणि प्रतिष्ठा खराब करणे हा होता असे सुभाष राजोरा यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. बदनामी, शांततेचा भंग, हेतुपुरस्सर अपमान, गुन्हेगारी धमकी आणि इतर आरोपांसाठी वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात राजोरा यांनी तक्रार दाखल केली आहे.


काय आहे रामगोपाल वर्मा यांचे ट्विट ?
राजोरा यांनी या तक्रारीत 22 जूनच्या ट्विटचा संदर्भ दिला आहे. 22 जून रोजी केलेल्या ट्विटमध्ये वर्मा यांनी लिहिले आहे की, “जर द्रौपदी राष्ट्रपती असतील तर पांडव कोण आहेत?  आणि महत्त्वाचे म्हणजे कौरव कोण आहेत? वर्मा यांच्या या ट्विटवर अनेकांनी टीका केली आहे. 


दोन दिवसांनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया आल्यानंतर वर्मा म्हणाले की, 'माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. हे फक्त विडंबनातून मांडले आणि इतर कोणताही हेतू नव्हता.  महाभारतातील द्रौपदी हे माझे आवडते पात्र आहे. परंतु हे नाव दुर्मिळ असल्याने मला फक्त संबंधित पात्रांची आठवण झाली. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला अजिबात हेतू नाही.'


दरम्यान रामगोपाल वर्मा यांचे ट्विट अनुसूचित जातीतील लोकांचा अनादर करण्यासारखे आहे आणि वर्मा सोशल मीडियावर असे वाद निर्माण करून, ज्येष्ठ महिला राजकारणी आणि झारखंडच्या माजी राज्यपालांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे राजोरा यांनी तक्रारीत म्हटले आहे.


याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिल्यानंतर तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी वांद्रे न्यायालयात 10 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.