मुंबई : चालतंय की’ म्हणत समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील पहिलवान गडी राणादा सध्या खूपच लोकप्रिय झाला आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना या राणाने वेड लावलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरीराने जरी दांडगा पहिलवान असला तरी मनाने अतिशय साधा सरळ असलेल्या राणाच्या या स्वभावामुळेच अंजलीही त्याच्या प्रेमात पडली आणि त्यांचं लग्नही झालं. राणाचे सर्व गुण चांगले असले तरी त्याचं शिक्षणापासून दूर पळणं, पुस्तकांना घाबरणं या गोष्टी अंजलीला आवडत नाहीत. लग्नानंतर अंजलीची वाचनाची आवड जपण्यासाठी राणा स्वतःहून तिला पुस्तके आणून देतो परंतु स्वतः मात्र त्यापासून दूर पळतो. 


अंजलीसुद्धा राणाला शिकविण्याचा चंग बांधते आणि त्या दिशेने प्रयत्न करायला लागते. परंतु त्यात तिला अपयशच मिळतं. त्यावेळी गोदाक्का तिला राणाच्या या भितीमागचं कारण सांगणार आहेत आणि यातूनच राणाचा बालपणीचा प्रवास उलगडणार आहे. राणाच्या बालपणीची हीच गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे गुरुवारपासूनच्या भागामध्ये. 


राणाला अभ्यासाची भिती का वाटते ? तो मुलींशी बोलायला का घाबरतो? त्याला कुस्तीचा छंद कसा जडला ? बरकतची आणि त्याची मैत्री कशी झाली ? या सगळ्या गोष्टींची उत्तरे येत्या काही भागांमधून बघायला मिळणार आहेत. रुद्र रेवणकर या बालकलाकाराने हा छोटा राणा साकारला आहे. त्यामुळे बालपणीच्या या राणाची धम्माल मस्ती बघायला विसरु नका ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वा. फक्त झी मराठीवर.