नव्या प्रेमकहाणीसह `आरके`चा पुनर्जन्म
रणधीर कपूर यांचा मोठा खुलासा.
नवी दिल्ली : साल १९४८ मध्ये आरके स्टुडिओची स्थापना राज कपूर यांनी केली. 'आग' या चित्रपटाच्या माध्यमातून आरके बॅनरची सुरूवात झाली. त्यानंतर या स्टुडिओमध्ये ‘आवारा’, ‘श्री 420’, ‘मेरा नाम जोकर’, ‘बॉबी’, ‘सत्यम शिवम सुंदरम’ आणि ‘राम तेरी गंगा मैली’ असे अनेक चित्रपटं साकारण्यात आलं. या स्टुडिओत अनेकांचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र गेल्या काही वर्षांपासून या स्टुडिओला टाळा लागला. परंतु या स्टुडिओमध्ये पुन्हा रोल, कॅमेरा, ऍक्शनचा आवाज ऐकू येणार आहे. RK फिल्म्स आता बॉलिवूडमध्ये पुन्हा दरमदार एन्ट्री करण्याच्या विचारात असल्याची आनंदाची बातमी समोर येत आहे.
ई-टाईम्सला रणधीर कपूर यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'आम्ही चित्रपट साकारण्याच्या विचारात आहोत. RK फिल्म्स आता पुन्हा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी चित्रपट प्रेम कथेवर आधारलेला असणार आहे. चित्रपटातील कलाकारांची घोषणा अद्याप करणार नाही. काही दिवसांमध्ये मोठ्या जल्लोषात चित्रपटातील मुख्य कलाकारांची घोषणा करू.' असं ते म्हणाले.
आरके बॅनरखाली नव्याने तयार होणाऱ्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी खुद्द रणधीर कपूर यांनी घेतली आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी RK फिल्म्सला भीषण आग लागली होती. त्यामुळे स्टुडिओमधील संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होतं. परिणामी २०१८ मध्ये हा स्टुडिओ गोदरेज प्रॉपर्टीला विकण्यात आला होता.