मुंबई: 'सिन्बा' सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेता रणवीर सिंग 'गली बॉय' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. रणवीरचा 'गली बॉय' सिनेमा १४ फेब्रुवारी म्हणजेच वेलेंटाइन डे दिवशी सिनेमागृहात दाखल होणार आहे. तर हा गली बॉय दीपिकाला काय भेट देणार हे ठरले आहे. 'वेलेंटाइन डे'... प्रेमाचा दिवस मानल्या जाणाऱ्या दिवशी रणवीर सिंग पत्नी दीपिकाला 'गली बॉय' सिनेमा दाखवणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ट्रेलर आणि गाण्यांना चाहत्यांकडून विशेष दाद मिळाली. स्ट्रीट रॅपर विवियन फर्नांडिज आणि नावेद शेख यांच्या खऱ्या जीवनावर आधारित 'गली बॉय' हा सिनेमा आहे. या सिनेमातून रॅपरचा प्रवास दाखवण्यात आला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक जोया अख्तर, निर्माता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी केले.



रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोन मागील वर्षी लग्न बंधणात अडकले. इटली मध्ये दोघांचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर त्यांनी स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. सिन्बा आणि खिलजी नंतर रणवीर चाळीतल्या मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे.   
 
ट्रेलर लॉन्चवेळी रणवीरने आपल्यासाठी हा सिनेमा अतिशय खास आहे, असे सांगितले. तो म्हणाला, जेव्हा मला 'गली बॉय' सिनेमाबद्दल सांगितले तेव्हा हा सिनेमा माझाच असल्याचे मी म्हणालो. जर माझ्या जागी अन्य कोणाला हा सिनेमा दिला गेला असता, तर मला वाईट वाटले असते.