`सिंबा`ला पायरसीचं ग्रहण, चित्रपट लीक
चित्रपट लीक होणं ही आता बाब आता अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
मुंबई : चित्रपट लीक होणं ही आता बाब आता अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. याचाच फटका आता अभिनेता रणवीर सिंग आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'सिंबा' या चित्रपटालाही बसला आहे. त्यामुळे पायरसीच्या ग्रहणापासून 'संग्राम भालेराव'ही स्वत:ला वाचवू शकलेला नाही, असंच म्हणावं लागेल. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटाच्या लीक होण्याचा फटका आता थेट या चित्रपटाच्या कमाईवर होणार, असं म्हणायला हरकत नाही.
तामिळ रॉकर्सवर यापूर्वी किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असणारा 'झिरो' हा चित्रपटही लीक झाला होता. त्याशिवाय 'केजीएफ', 'मारी २', 'ओडीयान', '२.०', 'सरकार' आणि असे बरेच चित्रपटही लीक झाले होते.
मुख्य म्हणजे तामिळ रॉकर्सविरोधात बरेच मोठे निर्माते, दिग्दर्शक तक्रार करत असून हा मुद्दा प्रकर्षाने उचलून धरत आहेत. पण, तरीही चित्रपटांना लागलेलं पायरसीचं हे ग्रहण काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही हेच स्पष्ट होत आहे.
हिंदी, तेलुगू, मल्याळम, इंग्रजी अशा विविध भाषांतील चित्रपटांनाही या पायरसीचा फटका बसत आहे. मुख्य म्हणजे त्यांच्याकडून बऱ्याच बनावट वेबसाइट चावलण्यात येत असल्यामुळे त्या सर्व वेबसाईट बंद करणं हेसुद्धा निर्माते, दिग्दर्शकांपुढचं आव्हानच आहे.
बरेच महिने खर्ची घालून, दिवस- रात्र मेहनत करुन कलाकार मंडळी विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर कलाकृती सादर करतात. पण, कोट्यवधी रुपये खर्चून साकारण्यात आलेल्या बऱ्याच चित्रपटांना पायरसीचा फटका बसल्यामुळे त्यांचीय पुढील वाटचाल खडतर होते. येत्या काळात हे संकट नेमकं कसं टाळता येईल यासाठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक प्रयत्नशील असल्याचं कळत आहे.