प्रसिद्ध अभिनेत्री रश्मीची आत्महत्या, वयाच्या २३ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
मनोरंजन क्षेत्रात रोज कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या बातम्या येत आहेत.
मुंबई : मनोरंजन क्षेत्रात रोज कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. या सगळ्या दरम्यान, लोकप्रिय ओरिया टेलिव्हिजन अभिनेत्री रश्मिरेखा ओझा हिच्या निधनाची बातमी समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिचा मृतदेह भुवनेश्वरमध्ये तिच्या भाड्याच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडली आहे. ती येथील नयापल्ली भागात राहायची. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 23 वर्षीय रश्मीच्या वडिलांनी या प्रकरणात मुलीचा लिव्ह-इन पार्टनर संतोष पात्रा याचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूची माहिती संतोषनेच दिल्याचंही त्यांनी पोलिसांना सांगितलं.
18 जूनच्या रात्री ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. शनिवारी वडिलांनी रश्मीला अनेक फोन केले पण अभिनेत्रीने फोन उचलला नाही. त्यानंतर संतोषने त्यांना फोन करून रश्मीने आत्महत्या केल्याचं सांगितलं.
घटनास्थळी पोलिस पोहोचल्यानंतर संतोष आणि रश्मी त्या घरात पती-पत्नी म्हणून राहत असल्याचं त्यांना समजलं. घरमालकाने ही माहिती दिली. रश्मीच्या वडिलांनीही सांगितलं की, ''याआधी मला मुलीच्या लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल माहिती नव्हती''.
पोलिसांनी असामान्य मृत्यूची नोंद केली आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट येण्याची पोलीस वाट पाहत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रश्मीने एक सुसाइड नोट देखील सोडली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे.