मुंबई : झी मराठीवरील Zee Marathi 'रात्रीस खेळ चाले' Ratris Khel Chale या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. यानंतर वाहिनीने मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांसमोर आणला. यातील अण्णा नाईक म्हणजे माधव अभ्यंकर आणि शेवंता म्हणजे अपूर्वा नेमळेकर यांना तर प्रेक्षकांनी चक्क उचलून घेतलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण, गोवा फिरायला आलेलं लोकं मालिकेचं शुटिंग सुरू असलेल्या 'आकेरी' गावाला आर्वजून भेट देतात. आकेरी गावातील 'नाईकांचा वाडा' हे तर पर्यटन स्थळ बनलं आहे. या ठिकाणी गर्दी वाढू लागली त्याचप्रमाणे कलाकारांसोबत सेल्फी काढणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली. यानंतर अण्णा नाईक म्हणजे अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या डोक्यात एक खास कल्पना आहे. 


कलाकारांनी प्रेक्षकांसोबत सेल्फी काढायचा पण प्रेक्षकांना एका पेटीत जमेल ती रक्कम टाकायला सांगायची. 'रक्कम टाका आणि सेल्फी काढा' या नियमानुसार सेल्फी काढले गेले आणि पेटीत रक्कम टाकली गेली. रकमेचं कोणतंही बंधन नव्हतं. फक्त पेटीवर 'सैनिक हो तुमच्यासाठी' असं लिहिण्यात आलं. 


या पेटीत जमा होणारी रक्कम सैनिक शाळा किंवा सैनिकांना देण्याचा मानस 'रात्रीस खेळ चाले' या टीमचा होता. या उपक्रमाला सुरूवात होऊन आत वर्ष झालं आहे. या वर्षात दोन पेट्या भरल्या. पेटीतील रक्कम मोजल्यानंतर जवळपास ही रक्कम लाखाच्या घरात होती. ही रक्कम अंबोलीतल्या सैनिक शाळेला देण्यात येणार आहे. 


26 जानेवारी प्रजासत्तक दिनी सकाळी आठ वाजता अंबोलीतील सैनिक शाळेत ही रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे. आज कलाकारांसोबत सेल्फी काढण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. पण सेल्फी करता असा उपक्रम राबवलेली ही पहिलीच मालिका आणि हे पहिलेच कलाकार आहेत. यांच्या या उपक्रमाचं सगळीकडूनच कौतुक होत आहे.