मुंबई : प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांच्या निधनानंतर शुक्रवारी त्यांच्या कुटुंबीयांनी एक मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये वाजिद खान ज्या रुग्णालयात उपचार घेत होते तेथील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार देखील मानले आहेत. कुटुंबीयांनी सांगितले की  वाजिद यांचा मृत्यू किडनी संसर्गामुळे नाही तर कार्डियक अरेस्टमुळे झाला आहे. परंतु कुटुंबीयांनी केलेल्या स्पष्टीकरणामध्ये कोरोनाचा उल्लेख नाही. वाजिद यांचं निधन १ जून रोजी झालं होतं. आता त्यांच्या निधनाचं खरं कारण समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आपले प्रिय वाजिद खान यांनी वयाच्या ४७व्या अखेरचा श्वास घेतला. १ जून रोजी कार्डियक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. मुंबईच्या सुराना सेठिया रुग्णालयात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. गेल्या वर्षी यशस्वीरित्या त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीया पार पडली होती. त्यांनंतर घश्याचा संसर्ग बळावल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे स्पष्टीकरण  त्यांच्या कुटुंबीयांनी दिलं आहे. 



दरम्यान, साजिद-  वाजिद आणि सलमान खानचे चित्रपट हे प्रेक्षकांसाठीचं अफलातून समीकरण यापुढे मात्र काहीसं अपूर्णच राहिल. या लोकप्रिय संगीतकार जोडीनं आतापर्यंत 'वॉण्टेड', 'दबंग', 'एक था टायगर' अशा चित्रपटांना संगीत दिलं होतं. 


सांगायचं झालं तर गेल्या दोन महिन्यांमध्ये  बॉलिवूडला बसलेला हा तिसरा मोठा धक्का आहे. सर्व प्रथम २९ एप्रिल रोजी अभिनेते इरफान खान यांनी या जगाचा निरोप घेतला. या घटनेला २४ तास उलटत नाही तर दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आली. तर जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी दिग्गज संगीतकार वाजिद खान यांनी अखेरचा श्वास घेतला.