मुंबई : Saaho movie review #Saaho भारतातील आतापर्यंतचा सर्वाधिक निर्मिती खर्चामध्ये साकारलेला चित्रपट म्हणून प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘साहो’ या चित्रपटाकडे पाहिलं जात आहे. अमुक एका दृश्यावर इतके कोटी, तमुक एका दृश्यासाठी या कलाकाराची वर्णी अशा बहुविध चर्चा सुरुवातीपासूनच साहोला चर्चेत आणण्यास कारणीभूत ठरला. पण, मुळात आता हा चित्रपट खरंच या चर्चांना न्याय देतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या उत्सुकतेला कारण आहे ते म्हणजे अशा पाच कारणांचं ज्यांमुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

* साहस, थरार आणि बरंच काही : ‘साहो’च्या फर्स्ट लूकपासून ते अगदी या चित्रपटाच्या ट्रेलरपर्यंत आणि नवनव्या फोटोंपर्यंत सर्वच बाबतीत साहसाची झलक पाहायला मिळाली. त्यातही दिग्दर्शकाने आधीच चित्रपच प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणार असल्याची हमी दिली होती. त्यामुळे ही हमी पाहता प्रेक्षकांनी नाराजी होणार नाही असं म्हणावं लागेल.


* प्रभास : काय म्हणावं या अभिनेत्याविषयी असंच होतं अनेकजणींचं प्रभासचं नाव घेतल्यावर. ‘बाहुबली’च्या निमित्ताने तो खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करुन गेला. पाहता पाहता, त्याच्या प्रत्येक रुपावर चाहते वेडेपीसे झाले, असं म्हणणं अतिशयोक्ती मुळीच ठरणार नाही. त्यामुळे प्रभासच्या अमाप लोकप्रियतेचा फायदा या चित्रपटाला नक्कीच होणार आहे.


* नव्या जोडीची केमिस्ट्री : प्रभासचं नाव अनेक दाक्षिणात्य अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे. किंबहुना एका अभिनेत्रीसोबत त्याची ऑनस्क्रीन केमिस्ट्री बरीच गाजली. आता ते नाव वेगळं सांगण्याची गरज नाही. पण, ‘साहो’च्या निमित्ताने एक नवी जोडी प्रेक्षकांची भेट घेण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे ‘बाहुबली’ प्रभास आणि ‘आशिकी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी श्रद्धा, असे दोन्ही कलाकार जेव्हा एकत्र झळकतील तेव्हा त्यांची ही केमिस्ट्री चित्रपटाच्या जमेची बाजू ठरेल.


* सहायक कलाकारांची दमदार फौज : प्रभास आणि श्रद्धा या दोन महत्त्वाच्या कलाकारांसोबतच साहोमधील एक अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या चित्रपटातील सहायक कलाकार. नील नितीन मुकेशचं खलनायकी रुप कसं असेल, हेच जाणून घेण्यासाठी चाहते वारंवार सोशल मीडिया आणि इंटरनेटवर उपलब्ध अशा अनेक माध्यमांची मदत घेत होते. त्यातच चंकी पांडेचा चित्रपटातील लूक पाहिला तर, आता हे महाशय कोणत्या नव्या वाटेवर निघणार हा प्रश्नही प्रकर्षाने पुढे आला. एकंदर काय, तर ‘साहो’ पाहण्याची ही भक्कम कारणं पाहता आता त्यात आणखी भर घालायची की थेट जाऊन चित्रपट पाहायचा हे तुम्हीच ठरवायचं आहे.