`बसपन का प्यार` फेम सहदेव दिरदोचं नवं गाणं भेटीला, होतोय ट्रोल
बसपन का प्यार` गाऊन इंटरनेटवर धुमाकूळ घालणारा छत्तीसगडचा सहदेव दिरदो एक नवीन गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
मुंबई : बसपन का प्यार' गाऊन इंटरनेटवर धुमाकूळ घालणारा छत्तीसगडचा सहदेव दिरदो एक नवीन गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या महिन्यात एका रोड एक्सिडंटमध्ये जखमी झाल्यानंतर सहदेव पूर्ण बरा झाला आहे. अपघातानंतर सहदेवने नवीन गाण गायलं आहे.
अपघातानंतर सुकमा आणि रायपूरमध्ये जवळ-जवळ 15 दिवस सहदेववर उपचार करण्यात आले. बरा झाल्यानंतर त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आणि चाहत्यांचे आभार मानले. यानंतर आता त्याने एक नवीन व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट्सही येत आहेत.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या नवीन व्हिडिओमध्ये सहदेव यावे'वाले वेले हो गया था जो, व्यस्त-व्यस्त हो गया है वो...' हे गाणं गाताना दिसतोय. इन्स्टाग्रामवर अनेक यूजर्स सहदेवला काहीतरी वेगळं करण्याचा सल्ला देत आहेत.
एकाने कमेंट करत लिहिलंय की, बेटा हे पुन्हा पुन्हा चालणार नाही. तर काही युजर्सने त्याला अपशब्द वापरून गलिच्छ कमेंट्सही केल्या आहेत. मात्र, या कमेंट्सवर सहदेवकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सहदेव दिरदो आपल्या कामात व्यस्त आहे. तो त्याच्या नव्या असाइनमेंटवर लक्ष केंद्रित करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
इंटरनेटवर वायरल ब्यॉयच्या नावे फेमस
छत्तीसगडच्या गंभीर नक्षलग्रस्त बस्तर विभागातील सुकमा येथे राहणारा सहदेवने 2019 मध्ये त्याच्या शाळेच्या वर्गात 'जाने मेरी जानेमन' हे गाणं गायलं होतं. गाणं गाताना त्याच्या शिक्षिकेने व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. सहदेवची गाण्याची वेगळी स्टाईल लोकांना प्रचंड आवडली.
हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यानंतर, 2021 मध्ये, प्रसिद्ध गायक बादशाहने त्याच्यासोबत या गाण्यावर एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो लोकांना खूप आवडला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही सहदेव दिरदोचा गौरव केला. गेल्या डिसेंबरमध्ये सुकमा येथे रोड एक्सिडंटमध्ये तो गंभीर जखमी झाला होता. या अपघातातून सावरल्यानंतर सहदेव पुन्हा काम करण्यासाठी सक्रिय झाला आहे.