मुंबई : लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणी अभिनेते आलोकनाथ यांना दिलासा मिळाला आहे. पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला असून, हा त्यांच्यासाठी एक मोठा दिलासा आहे. आलोकनाथ यांच्यावर विनता नंदा यांन केलेल्या बलात्कारांच्या आरोपांनंतर शनिवारी दिंडोशी सत्र न्यायालयाने संबंधीत प्रकरणाची सुनावणी करत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायालयाकडून देण्यात आलेल्या या निर्णयानंतर आता ओशिवरा पोलीस आलोकनाथ यांना अटक करु शकत नाहीत. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर आरोप करत सुरु केलेल्या #MeToo या चळवळीअंतर्गत विनता नंदा यांनीची त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली होती. 


ज्यानंतर थेट पोलिसांपर्यंत हे प्रकरण जाऊन पोहोचलं. पुढे आपल्यावर होणारे गंभीर आरोप पाहता, अटक टाळण्यासाठी आलोकनाथांनी अटकपूर्व जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केला होता. त्यांच्यावर ३७६ नुसार बलात्काराचा गुन्हाही दाखल करण्याच आला होता. 


कायद्याच्या दाराशी गेलेल्या या प्रकरणी चौकशी सुरु असताना ओशिवरा पोलीसांनी अनेकदा आलोकनाथ यांना समन्स बजावलं होतं. जे आलोकनाथ यांनी अनेकदा झुगारलं. 



विनता नंदा यांनी कोणते आरोप केले होते?


टेलिव्हिजन शो 'तारा' च्या निर्मात्या आणि लेखिका विनता नंदा यांनी काही महिन्यांपूर्वी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून नाव न घेता आलोकनाथ यांचं खरं रुप सर्वांसमोर आणलं होतं.


 'जेव्हा मी १९९४ मध्ये 'तारा' या मालिकेसाठी लिखाणाचं काम करत होते आणि त्या मालिकेच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळत होते, तेव्हा माझ्यासोबत शारीरिक दुर्व्यवहार करण्यात आला होता', असं त्यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं. विनता यांनी आरोप केल्यानंतर इतरही काही अभिनेत्रींनी आलोकनाथ यांच्या वागण्याविषयीचे गौप्यस्फोट केल्याचं पाहायला मिळालं होतं. आपल्यावर करण्यात आलेले हे सर्व आरोप आलोकनाथ यांनी फेटाळून लावले होते