आरके स्टूडिओला लागलेल्या आगीवर व्यंगचित्र; ऋषी कपूर नाराज
आरके स्टूडिओ आग लागून खाक झाल्यावर एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले आहे. हे व्यंगचित्र पाहून अभिनेते ऋषी कपूर चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी आपला संताप ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
मुंबई : आरके स्टूडिओ आग लागून खाक झाल्यावर एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले आहे. हे व्यंगचित्र पाहून अभिनेते ऋषी कपूर चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी आपला संताप ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वीच लागलेल्या आगीत मुंबईतील प्रसिद्ध आरके स्टुडिओ जळून खाक झाला. स्टूडिओ जळाल्यामुळे बॉलीवूडमधूनही हळहळ व्यक्त झाली. शोमॅन राज कपूर यांनी १९४८ मध्ये या स्टूडिओची स्थापना केली होती. विशेष असे की, या स्टूडिओत चित्रीत झालेल्या पहिल्या चित्रपटाचे नावही 'आग' असे होते. त्यामुळे एका व्यंंगचिकाराने त्या 'आग'सोबत या आगीचा संबंध जोडत एक व्यंगचित्र काढले आहे. या व्यंगचित्रात राज कपूर यांना दाखवण्यात आले असून, 'आग' माझ्यासाठी नेहमीच चांगली ठरली आहे. सर्व काही 'आग'पासूनच सुरू झाले होते, अशा ओळीही व्यंगचित्राखाली आहेत. हे व्यंगचित्र प्रकाशित होताच सोशल मीडियातूनही व्हायरल झाले.
दरम्यान, राज कपूर यांचा मुलगा ऋषी कपूर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'हे चांगले नाही. अशा प्रकारच्या विनोदावर मला आक्षेप आहे', असे ट्विट करत कपूर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. आगीत सर्व काही खाक झाल्यावर ऋषी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या होत्या. त्यात त्यांनी म्हटले होते की, 'स्टूडिओ पुन्हाही उभारला जाऊ शकतो. पण, स्टूडिओसोबत जोडल्या गेलेल्या भावना, आठवणीही खाक झाल्या याचे दु:ख आहे'.
आरके स्टुडिओने 'बरसात' (१९४९ 'अवारा' (१९५१) 'बूट पॉलिश' (१९५४) 'श्री ४२०' (१९५५ ) 'जागते रहो' (१९५६) तसेच(१९८२) 'राम तेरी गंगा मैली' (१९८५) यासारखे सुपरहीट चित्रपट दिले आहेत.