`एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही अन्...`; म्हणत रितेश देशमुखनं केली आगामी चित्रपटाची घोषणा!
Riteish Deshmukh Upcoming Marathi Movie : छत्रपती शिवाजी महाराजांची 394 व्या जयंती निमित्तानं रितेश देशमुखनं केली आगामी चित्रपटाची घोषणा...
Riteish Deshmukh Upcoming Marathi Movie : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखनं 'वेड' या मराठी चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं. रितेशला या चित्रपटासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394 व्या जयंती जगभरात साजरी केली जात आहे. त्याच निमित्तानं पोस्ट शेअर करत रितेशनं त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्या घोषणेनंतर सगळ्यांना आनंद झाला आहे.
रितेशनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. खरंतर काल रितेशनं एक पोस्ट शेअर करत 'युद्ध धर्म, धर्म युद्ध' असं म्हटलं होतं. तर आज रितेशनं एक पोस्ट शेअर करत त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. रितेशच्या या आगामी चित्रपटाचं नाव राजा शिवाजी असं आहे. या चित्रपटाचं एक पोस्टर रितेशनं शेअर केलं आहे. तर या पोस्टरमधून एक गोष्ट समोर आली आहे की स्वत: रितेश या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. तर जिनिलिया या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. जिनिलियासोबत या सह निर्मात्या या ज्योती देशपांडे आहेत.
चित्रपटाची घोषणा करत रितेश म्हणाला, "इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जीचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज... फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तिनशे वर्षांपासून... प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे. शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्यानं एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं …आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे….’राजा शिवाजी’."
दरम्यान, या चित्रपटात स्वत: रितेश छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे की नाही? याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. इतकंच नाही तर या चित्रपटात दुसरे कोणते कलाकार दिसणार याविषयी देखील काही समोर आलेलं नाही. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हिंदी आणि मराठी अशा दोन भाषेत हा चित्रपट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर चित्रपटाला संगीत बद्ध अजय-अतुल करणार आहेत.