मुंबई : अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो. रितेशनं नुकतेच ट्विटरवरून रायगडावरील काही फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले होते. पण, या फोटोंनी रितेशच्या अडचणी वाढवल्या. या फोटोंमुळे रितेशला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलं. या फोटोंमध्ये रवी जाधव आणि विश्वास पाटीलही दिसत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितेशनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो रायगडावरील मेघडंबरीत चढून शिवाजी महाराजांच्या पायावर डोकं टेकवताना दिसतोय. यानंतर, मेघडंबरीवर चढून रितेशनं महाराजांचा अनादर केल्याचं म्हणत ट्रोलर्सनं त्याला चांगलंच फैलावर घेतलं. 



यावर खासदार, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजे यांनीही रितेशच्या या वर्तनावर आपला आक्षेप नोंदवला. 'रायगडावरील सिंहासनाच्या चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मुर्तीकडे पाठ करुन काढलेले काही सेलिब्रेटिंचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. हे खरोखरच निंदनीय आहे. आज होणाऱ्या रायगड विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार असून त्यातील नियम सर्वांना बंधनकारक असतील' असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 



चौफेर होत असलेली टीका पाहून रितेशनंही माफीचा पर्याय निवडला. माफी मागण्यासाठीही त्यानं सोशल मीडिया हाच मार्ग निवडला. 'शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केलं. तिथे बसून आम्ही काही छायाचित्रे घेतली आणि ती सोशल माध्यमातून पोस्ट केली. यामागे फक्त भक्तिभाव होता. ती छायाचित्र घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र, आमच्या या कृत्यामुळे कोणीही दुखावलं असेल तर त्याची आम्ही अंत:करणपूर्वक माफी मागतो' असं त्यानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.