`तुम्हाला घट्ट मिठी मारायचीये बाबा`; विलासरावांच्या आठवणीने गहिवरला रितेश
एक अभिनेता म्हणून तो जितका संपन्न आहे, तितकाच तो एक व्यक्ती म्हणूनही कायमच सर्वांची मनं जिंकत असतो.
मुंबई : हिंदी कलाविश्वात गाजलेलं मराठमोळं नाव आणि सर्वांच्याच मनावर राज्य करणारा अभिनेता अशी रितेश देशमुखची ओळख. रितेशची नव्यानं ओळख करुन देण्याची गरज नाही. एक अभिनेता म्हणून तो जितका संपन्न आहे, तितकाच तो एक व्यक्ती म्हणूनही कायमच सर्वांची मनं जिंकत असतो.
एक मुलगा, एक पती, एक पिता आणि एक भाऊ अशा प्रत्येक भूमिकेला रितेश मोठ्या जबाबदारीनं निभावतो. कायमच सर्वांपुढे हसऱ्या चेहऱ्यानं येणारा हाच अभिनेता आज मात्र गहिवरला आहे. (riteish deshmukh shares an emotional post remembering his father vilasrao deshmukh)
अश्रू थांबत नाहीयेत, एका व्यक्तीच्या जाण्याची पोकळी त्याला सतत जाणवतेय. ती व्यक्ती म्हणजे रितेशचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची.
विलासरावांच्या जन्म दिवसाच्या निमित्तानं रितेशनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं शब्दांवाटे भावना व्यक्त केल्या आहेत.
'मला तुम्हाला घट्ट मिठी मारायचीये, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. तुमच्या पायांना स्पर्श करुन आशीर्वाद घ्यायचे आहेत. मला तुम्हाला आनंदात पाहायचंय, पाठीवर थाप मारून मी तुझ्यासोबत आहे असं मला म्हणाताना पाहायचंय. मला तुमचा हात धरुन चालायचंय. नातवंडाशी खेळताना, त्यांना पुढे घेऊन चालताना पाहायचंय... मला तुम्ही हवे आहात.... बाबा. आठवण येतेय तुमची', असं लिहित रितेशनं विलासरावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सोबतच त्यानं काही फोटोही पोस्ट केले, जिथं रितेशची दोन्ही मुलं विलासरावांच्या फोटोपुढे हात जोडून उभी असल्याचं दिसत आहे.
एका मुलाच्या आयुष्यात वडिलांचा आधार किती महत्त्वाचा असतो हेच त्याची पोस्ट वाचताना पुन्हा लक्षात आलं आणि नकळतच डोळे पाणावले.