रितेशने मानले उपमुख्यमंत्री अजित दादांचे आभार
ट्विटरच्या माध्यमातून रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुंबई : मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महसुलवाढी संदर्भात परिवहन विभागाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत मुंबईतील 'इस्टर्न फ्री वे' मार्गाला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार अशी घोषणा करण्यात आली. शिवाय लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी सूचना देखील अजित पवारा यांनी नगरविकास विभागाला दिली.
त्यामुळे विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख याने अजित पवारांचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहे. ‘इस्टर्न फ्री वे’ला वडिलांचे देण्यात येणार असल्यामुळे रितेश देशमुख चांगलाच भावूक झाला.
त्याने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'श्री विलासराव देशमुखजी यांनी केलेल्या कामाला आज तुम्ही मान दिला, त्याबद्दल - मुलगा म्हणून मी सदैव आपला आभारी राहीन, अजित दादा...' असं भावनात्मक ट्विट रितेशने केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच यासंदर्भात एक ट्विट पोस्ट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी 'मुंबईतल्या 'इस्टर्न फ्री वे'ला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात येईल. त्यासंदर्भातील सूचना नगरविकास विभागाला दिल्या' असं म्हटलं आहे.
राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसुलवाढीसंदर्भात परिवहन विभागाच्या बैठकीत वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिवहनसेवा सुधारण्यासंदर्भात अनेक सूचना केल्या