मुंबई :  भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेला आपल्याच मातीतला, आपल्यातलाच एक सामान्य पण असामान्य व्यक्तिमत्वचा, हुशार आणि चौकस मुलगा, अवघ्या महाराष्ट्राचा लाडका 'फास्टर फेणे' येत्या २७ ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लई भारीसारख्या यशस्वी चित्रपटानंतर झी स्टुडिओज् आणि जिनिलीया व रितेश देशमुख यांची मुंबई फिल्म कंपनी पुन्हा एकदा ह्या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित, झी स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित व क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून साकारलेला फास्टर फेणे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. 


झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अमेय वाघ ह्या चित्रपटात बनेश उर्फ फास्टर फेणेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.


काय आहे चित्रपटाची कथा


  
चित्रपटाची कथा आहे,बनेश्वरवरून पुण्यात मेडिकलची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका जिज्ञासू आणि उत्साही मुलाची म्हणजेच बनेश फेणेची. पक्षीमित्र,निसर्गप्रेमी,टेक्नॉलॉजिचा चाहता आणि सायकलपटू असलेला बनेश पुण्यात येतो तेव्हा तो, त्याची बालमैत्रीण आणि आता पत्रकार असलेल्या अबोलीला तसेच गुन्हेगारी सोडून सरळमार्गी जगायला लागलेल्या लहान मुलाला- भूभू ला भेटतो. बनेश परीक्षेच्या तयारीला लागतो. 


अबोली भेटते...


परीक्षा केंद्रावर त्याची धनेश नावाच्या एका चुणचुणीत आणि हुशार मुलाशी ओळख होते. अन् दुसऱ्याच दिवशी एक अनपेक्षित घटना बनेशला मुळापासून हादरवून टाकते आणि सगळ्यांच्याच आयुष्यात एक विलक्षण गुंतागुंत तयार होते. शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात आणि सर्वसामान्य माणसाच्या आकलनापलीकडे असणारा निगरगट्ट वृत्तीचा अप्पा; सत्य शोधून काढल्याशिवाय चैन न पडणाऱ्या आणि संकटांना बेधडकपणे सामोरं जाणाऱ्या फेणेसमोर आव्हान म्हणून उभा ठाकतो.


अप्पाच्या भूमिकेत गिरीश कुलकर्णी...


या जीवघेण्या शोधात फेणे यशस्वी होतो का याबद्दलचा उत्कंठावर्धक प्रवास या चित्रपटामधून पाहायला मिळेल. अप्पांच्या भूमिकेत दिसणार आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि अष्टपैलू अभिनेते गिरीश कुलकर्णी. ह्या चित्रपटाचे प्रेरणास्थान असणारे भा. रा.भागवत हे सुद्धा या चित्रपटात आहेत हे विशेष आणि ही भूमिका साकारली आहे ज्येष्ठ आणि महाराष्ट्राचे लाडके अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी.


भा. रा. भागवतांची कथा...


कथा, पटकथा आणि संवाद या माध्यमातून भा. रा. भागवतांचा सत्तर-ऐंशीच्या दशकातला फास्टर फेणे क्षितिज पटवर्धन यांनी आजच्या काळात आणला आहे. चित्रपटात अमेय वाघ, गिरीश कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, पर्ण पेठे, शुभम मोरे, ओम भुतकर, अंशुमन जोशी, श्रीकांत यादव आणि चिन्मयी सुमीत अशी कलाकारांची मांदियाळी आहे. नारबाची वाडी,क्लासमेट्स  सारख्या यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी या नव्या काळाच्या नव्या फास्टर फेणेला पडद्यावर साकारले आहे. 


साठ वेगळ्या लोकेशनवर शूट... 


वेग आणि थरार असलेल्या ह्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचं शूटिंग तब्बल साठ वेगवेगळ्या लोकेशन्सवर पार पडलं असून, चित्रीकरणाची जबाबदारी पेलली आहे मिलिंद जोग यांनी आणि ध्वनीआरेखन केलेलं आहे प्रमोद चांदवरकर आणि प्रणाम पानसरे यांनी .वेशभूषाकार कल्याणी कुलकर्णी-गुगळे यांनी फास्टर फेणेला त्याच्या पेहरावातून वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. चित्रपटाचे बहुचर्चित पार्श्वसंगीत केलं आहे ट्रॉय आणि अरिफ या संगीतकार जोडीने तर संकलन केलं आहे फैजल महाडिक आणि इम्रान महाडिक यांनी. 


सोशल मीडियावर टीझरला प्रतिसाद...


सोशल मीडियावर या चित्रपटाच्या दोन्ही टिझरला जोरदार प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार यात शंका नाही. हा सिनेमा भा. रा भागवत यांना आदरांजली म्हणून त्यांच्या स्मृतीदिनी, २७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओज् चे मंगेश कुलकर्णी आणि मुंबई फिल्म कंपनीचे जिनीलीया आणि रितेश देशमुख यांची निर्मिती असलेला फास्टर फेणे हा चित्रपट प्रत्येक पिढीतील प्रेक्षकांचे मन जिंकुन घेण्यास सज्ज झालाय.