मुंबई : चित्रपट जेव्हा देशभर प्रदर्शित होण्यास सुरुवात झाली त्यावेळी चित्रपटाच्या कमाईत दमदार वाढ झाल्याचं दिसून आलं. सुरुवातीच्या दिवसांमध्ये चित्रपटांच्या प्रदर्शित होण्याची ठिकाणं ही मर्यादित आणि निर्धारित अशीच होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदी चित्रपट हिंदी भाषिक राज्यांमध्ये तर तामिळ, तेलुगू आणि कानडी चित्रपट तत्सम भाषा प्रचलित असणाऱ्य़ा राज्यांमध्ये प्रदर्शित होत होते. परिणामी चित्रपटांची कमाईसुद्धा मर्यादित होती. 


पण, काळ बदलला आणि चित्रपटांचं चित्रीकरण देशातील सर्व भाषिक प्रेक्षकांना नजरेत ठेवून करण्यात येऊ लागलं. अखेर भाषेच्या आणि प्रेक्षकांच्या सीमा ओलांडून चित्रपट धमाकेदार कामगिरी करु लागले आणि पाहता पाहता चित्रपटांच्या कमाईत लक्षणीय भर पडू लागली. 


RRR 'आरआरआर' उदाहरण घ्यायचं झालं, तरी या चित्रपटानं 18 दिवसांमध्ये 1030 कोटी रुपयांची कमाई केली. 1000 कोटींच्या कमाईचा आकडा ओलांडणारा हा तिसरा चित्रपट ठरला आहे. 


याआधी आमिरचा 'दंगल' आणि प्रभास चा 'बाहुबली-2' हे चित्रपट 1000 कोटींच्या कमाईचा आकडा ओलांडण्यात यशस्वी ठरले होते.  'बाहुबली-2'नं जागतिक स्तरावर 1780 कोटी रुपयांची कमाई केली होती. भारतीय बॉक्स ऑफिसवरही थक्क करणाऱ्या कमाईचा आकडा गाठणारा हा पहिला चित्रपट ठरला होता. 



उलटपक्षी आमिरच्या 'दंगल'नं 2112 कोटी रुपये कमवले असले तरीही यामध्ये 1500 कोटींचा गल्ला हा चीनमधून आलेल्या कमाईचा होता. 


आता मुद्दा असा की हे चित्रपट इतकी कमाई करण्यात कसे यशस्वी ठरले. तर, चित्रपटाचं कथानक, कलाकार, दिग्दर्शन आणि इतर प्रत्येक लहानमोठी गोष्ट चित्रपटाच्या यशात भर टाकणारी ठरली. 


चित्रपटाचं कथानक ज्यावेळी प्रेक्षकांना आपलंसं वाटतं तेव्हा त्याची मौखिक प्रसिद्धी जास्त होते. याचाच फायदा अधिक प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यामध्ये परावर्तित होतं. तळागाळाच्या सिंगल स्क्रीन थिएटरपासून ते अगदी मल्टीप्लेक्समध्येही जेव्हा चित्रपटांचे शो येतात त्यावेळी स्वस्त तिकिटापासून महागड्या तिकिटांपर्यंतचे दरसुद्धा प्रत्येकाच्या खिशाला परवडतील अशाच स्तरांमध्ये असतात. 


प्रत्येक वर्गातील प्रेक्षकांना यामुळं चित्रपट थेट मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळते. आणि हीच बाब चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठ्या प्रमाणात भर टाकताना दिसते.