श्रीदेवी आपल्यात नाहीत हे पचवणं फारच कठीण - सचिन तेंडुलकर
८०च्या दशकातील बॉलीवूडवर राज्य करणाऱ्या श्रीदेवी यांचे दुबईत शनिवारी रात्री उशिरा निधन झाले.
मुंबई : ८०च्या दशकातील बॉलीवूडवर राज्य करणाऱ्या श्रीदेवी यांचे दुबईत शनिवारी रात्री उशिरा निधन झाले.
त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. कौटुंबिक सोहळ्यासाठी दुबईत गेल्या असताना हार्ट अॅटॅकने त्यांचे निधन झाले.
भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरनेही श्री देवींच्या निधनाच्या बातमीबाबत दु:ख व्यक्त केले. ही बातमी ऐकल्यानंतर कसं व्यक्त व्हावं हे कळत नाहीये. आम्ही त्यांना पाहतंच मोठे झालो. त्या आपल्यात नाहीत हे सत्य पचवणं फारच कठीण आहे. या दुख:दसमयी मी त्यांच्या कुटुंबासोबत आहे, अशा भावना सचिनने यावेळी व्यक्त केल्या.
वयाच्या चौथ्या वर्षी कारकिर्दीला सुरुवात
श्रीदेवीचा जन्म १३ ऑगस्ट १९६३मध्ये तामिळनाडूमध्ये झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासून तिने कारकिर्दीला सुरुवात केली होती. तामिळ सिनेमा कंधन करुणाई या सिनेमातून कारकिर्दीला सुरुवात केली. दाक्षिणात्या सिनेमातून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर १९७९मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून सोलवाँ साल या सिनेमातून काम केले.
८०च्या दशकात श्रीदेवी आपल्या कारकीर्दीत एका वेगळ्याच उंचीवर होती. तिने हिम्मतवाला, तोहफा, मिस्टर इंडिया, नगिना सारख्या सुपहिट सिनेमे दिले. तिला लेडी अमिताभ बच्चन म्हटले जात अशे. २०१२मध्ये श्रीदेवीने इंग्लिश विंग्लिश या सिनेमातून दमदार पुनरागमन केले होते.