मुंबई : सैफ अली खान स्टारर 'लाल कप्तान' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. पण चित्रपट प्रदर्शित होताच काही तासांत ऑनलाइन लीक झाला आहे. इतर चित्रपटांप्रमाणेच लाल कप्तानलाही पायरसीचा फटका बसला आहे. पायरसी वेबसाइट तमिलरॉकर्सने संपूर्ण चित्रपटच ऑनलाईन  लीक केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट बनवताना एका चित्रपटामागे अनेक लोकांची मेहनत असते. चित्रपट बनवताना कोट्यवधी रुपये खर्च होत असतात. अशातच चित्रपट प्रदर्शनाच्या काही वेळातच तो लिक होणं हे चित्रपट निर्मात्यांसाठी मोठं नुकसानकारक ठरत आहे. चित्रपट लिक झाल्याचा थेट परिणाम त्याच्या बॉक्स ऑफिस कमाईवर दिसून येतो.


केवळ 'लाल कप्तान'च नाही तर याआधीदेखील तमिलरॉकर्सने अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही वेळातच लीक केले आहेत.  'द स्काय इस पिंक', 'वॉर', 'साहो', 'गली बॉय', 'भारत', 'सिंबा' यांसारख्या अनेक चित्रपटांना पायरसीचा फटका बसला आहे. 


तमिलरॉकर्सविरोधात बरेच मोठे निर्माते, दिग्दर्शक तक्रार करत असून हा मुद्दा प्रकर्षाने उचलून धरत आहेत. पण, तरीही चित्रपटांना लागलेलं पायरसीचं हे ग्रहण काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसल्याने कलाविश्वाची डोकेदुखी वाढली आहे.


हिंदी, तेलुगू, मल्याळम, इंग्रजी अशा विविध भाषांतील चित्रपटांनाही या पायरसीचा फटका बसत आहे. मुख्य म्हणजे त्यांच्याकडून बऱ्याच बनावट वेबसाइट चावलण्यात येत असल्यामुळे, वारंवार डोमेन बदलत असल्यामुळे या वेबसाईटला आळा घालणं, त्या सर्व वेबसाईट बंद करणं हेसुद्धा निर्माते, दिग्दर्शकांपुढचं आव्हानच आहे. पायरसी वाढवणाऱ्या आणि चित्रपट ऑनलाईन लीक करणाऱ्या या साइटवर सरकारने बंदी घातली आहे. मात्र तरीही तमिलरॉकर्सकडून सतत चित्रपट लीक केले जात आहेत.