एकनाथ शिंदे भेटीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले `सलमान खानला धमकी देणारे...`
अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घऱावर गोळीबार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली. दरम्यान सलमान खानला त्याच्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व कामं करण्यास सांगण्यात आल्याची माहिती सलीम खान (Salim Khan) यांनी दिली आहे.
बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील निवासस्थानी गोळीबार झाल्याची मुंबई पोलिसांसह (Mumbai Police) राज्य सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे. गॅलॅक्सीवर झालेल्या गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी निवासस्थानी जाऊन सलमान खानसह त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर सलीम खान (Salim Khan) यांनी 'इंडिया टुडे'शी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया नोंदवली. यावेळी त्यांनी सलमान खानला धमकी देणाऱ्यांना अशिक्षित म्हटलं. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण खान कुटुंबाला अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती दिली.
"यामध्ये बोलण्यासारखं काय आहे. हे अशिक्षित लोक जेव्हा आम्ही तुम्हाला ठार करु तेव्हा समजेल असं म्हणत आहेत," अशा शब्दांत सलीम खान यांनी संताप व्यक्त केला आहे. "आम्हाला अतिरिक्त पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी आम्हाला आणि आमच्या मित्रांना सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं आहे. जर त्यांनी दोघांना अटक केली आहे, तर याचा अर्थ ते कसून तपास करत आहेत," अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान सलमान खानला त्याच्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व कामं करण्यास सांगण्यात आल्याची माहिती सलीम खान (Salim Khan) यांनी दिली आहे. तसंच सध्या पोलीस तपास करत असल्याने त्यांना जाहीरपणे याबाबत विधानं करण्यास मनाई करण्यात आल्याचंही सलीम खान म्हणाले आहेत.
सलमान खानच्या घऱाबाहेर नेमकं काय झालं?
सलमान खानच्या घरावर रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. गोळीबार करण्याआधी दोन्ही हल्लेखोरांनी गॅलॅक्सीपासून 100 मीटरवर दुचाकी पार्क केली होती. घराबाहेर कोणीही नसल्याचं लक्षात आल्यानंतर ते पुन्हा दुचाकीवर जाऊन बसले आणि घरावर गोळीबार करत पळ काढला.
मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अनमोल बिष्णोईविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या जेलमध्ये असलेल्या लॉरेन्स बिष्णोईचा तो छोटा भाऊ आहे. अनमोल बिष्णोईने फेसबुकवर पोस्ट लिहून गोळीबाराची जबाबदारी स्विकारली आहे. तसंच या पोस्टमध्ये त्याने धमकीची भाषा वापरली आहे.
दरम्यान कच्छ पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवलं आहे. या दोन्ही आरोपींना मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं असता 25 एप्रिलपर्यंत मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवण्यात आलं. विकी गुप्ता (24) आणि सागर पाल (21) अशी बिहारमधील आरोपींची नावे असून त्यांना वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.