`धर्मवीर` सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेता सलमान खानने `या` कृतीने वेधलं लक्ष
मराठी मनावर काही दशकं राज्य करणाऱ्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या पडद्यावर येतोय
मुंबई : मराठी मनावर काही दशकं राज्य करणाऱ्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या पडद्यावर येतोय. हा लोकनेता म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे होय. देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव या लोकप्रिय चित्रपटांनंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे आता दिवंगत नेते आनंद दिघे यांचा जीवनपट मोठा पडद्यावर आणणार आहेत.
ठाण्यात दिवंगत आनंद दिघे यांनी शिवसेनेचा मोठा प्रचार आणि प्रसार केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन दिघे यांनी संघटन मजबूत केलं. समाजसेवेचं मोठं कार्य हाती घेतलं. ठाणे मुंबई, दक्षिण नाशिक, उत्तर रायगड परिसरात कार्यकर्ते तयार केले. मराठी मनावर त्यांनी आपल्या कार्याची छाप उमटवली. लोकहित तसेच धर्मासाठी काम करणाऱ्या दिघे यांना लोक धर्मवीर संबोधू लागले.
आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे नाव देखील 'धर्मवीर' असंच आहे. या चित्रपटाचे लेखन स्वतः प्रवीण तरडे यांनी केलं आहेत. या चित्रपटाचा टिझरला प्रतिसाद मिळाल्यानंतर या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मोठ्या दिमाखात पार पडतोय. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, संजय राऊत, अभिनेता रितेश देशमुख, आणि सलमान खान उपस्थित आहेत.
यावेळी सगळ्यांचं लक्ष वेधलं ते म्हणजे अभिनेता सलमान खानने. यावेळी ट्रेलर लाँन्चवेळी सगळ्या उपस्थित मान्यवरांना मंचावर आमंत्रित केलं. यानंतर सगळे उपस्थित पाहुणे आनंद दिघेंच्या फोटोसमोर नतमस्तक झाले. याचदरम्यान सलमानची एक कृती लक्षवेधी ठरली. ती म्हणजे शूज काढत आनंद दिघे यांना हात जोडून नमस्कार केला. त्याची ही कृती अनेक शिवसैनिक आणि सलमानच्या चाहत्यांना भावली आहे. पाहा याचाच हा व्हिडिओ
या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक साकारत आहे. या चित्रपटाचं चित्रिकरण ठाण्यातच झालं आहे. या चित्रपटात समाजकारणासह राजकारणाचा तडका असल्याने चाहते हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.