गँगस्टरने `गॅलॅक्सी`वर गोळ्या घालण्याआधी शूटर्सला काय सांगितलं? अखेर झाला खुलासा, `सलमान खान पूर्णपणे..`
Salman Khan Galaxy Firing: सलमान खानचं (Salman Khan) निवासस्थान `गॅलॅक्सी`वरील (Galaxy) गोळीबार प्रकरणी क्राइम ब्रांचने चार्जशीट दाखल केली आहे. 1735 पानांच्या चार्जशीटमध्ये शूटर्स आणि गॅगस्टर अनमोल बिष्णोई (Anmol Bishnoi) यांच्यात झालेल्या संभाषणाचा उल्लेख करण्यात आला आहे.
Salman Khan Galaxy Firing: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं मुंबईतील निवासस्थान 'गॅलॅक्सी'वर (Galaxy) 14 एप्रिल रोजी गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबाराआधी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई याने शूटर्सशी संवाद साधला होता. सलमान खान घाबरला पाहिजे असं त्याने शूटर्सला सांगितलं होतं. या संवादाच्या ऑडिओ क्लिप्स क्राइम ब्रांचच्या हाती लागल्या असून चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. क्राइम ब्रांचने एकूण 1735 पानांची चार्जशीट दाखल केली आहे.
विशेष न्यायालयात दाखल केलेल्या 1735 पानांच्या आरोपपत्रात क्राइम ब्रांचने गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोर आणि अनमोल बिष्णोई यांच्यातील संभाषणाच्या ऑडिओ क्लिपचा उल्लेख केला आहे. आरोपपत्रात म्हटलं आहे की, बिष्णोईने हल्लेखोर विकी गुप्ता आणि सागर पाल यांनी आपण निर्भय आहोत असं दाखवण्यासाठी हेल्मेट न घालण्याचा आणि धुम्रपान करण्याचा सल्ला दिला होता.
चार्जशीटमध्ये सलमान खानने दिलेल्या जबाबाचाही उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये त्याने अनमोल बिष्णोईकडून त्याच्या कुटुंबावर हल्ला होण्याचा धोका आहे असं सांगितलं आहे. सिग्नल ॲपवरील त्यांच्या संभाषणात अनमोल बिष्णोईने शूटर्सना अभिनेत्याच्या घराला लक्ष्य करून अनेक गोळ्या झाडण्याचा आदेश दिला होता असंही चार्जशीटमध्ये सांगण्यात आलं आहे. "भाई (सलमान) घाबरेल अशाप्रकारे गोळ्या झाडा. धुम्रपान करत रहा जेणेकरून तुम्ही (सीसीटीव्ही) कॅमेऱ्यात निर्भय दिसाल," असं त्याने सांगितलं होतं.
गोळीबार करण्यापूर्वी अनमोल बिष्णोई गुप्ता आणि पाल यांच्या सतत संपर्कात होता असं चार्जशीटमध्ये सांगण्यात आलं आहे. सध्या तुरुंगात असणारा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई यानेही हल्लेखोरांशी संपर्क साधल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. अनमोलने हल्लोखोरांना सांगितलं होतं की, जर ते यशस्वी झाले तर ते "इतिहास घडवतील" आणि त्यांचे नाव मीडियात दिसेल.
शूटर्स आणि इतर तिघे सोनूकुमार बिष्णोई, मोहम्मद रफिक चौधरी आणि हरपाल सिंग यांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. लॉरेन्स बिष्णोई, अनमोल आणि रावतरण बिष्णोई हे चार्जशीटमध्ये वॉण्टे़ड आरोपी आहेत. अनमोल कॅनडात असल्याचं समजत आहे. त्याच्या विरोधात लुकआउट परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.