इस्लामाबाद : काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरच्या न्यायालयात गुरुवारी सलमान खानला दोषी करार देताना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर सलमान खानला अटक करून जोधपूर सेंट्रल तुरुंगात धाडण्यात आलं. त्याचवेळी त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. यानंतर लगेचच सलमानच्या वतीनं न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आलाय. या जामीन अर्जावर शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे.


पाकिस्ताननं नाक खुपसलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानला शिक्षा झाल्यावर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी नाक खुपसलं आहे. सलमान खान मुस्लिम असल्यामुळे त्याला शिक्षा देण्यात आल्याचं वक्तव्य ख्वाजा आसिफ यांनी केलं आहे. तसंच सलमानचे सत्ताधारी पक्षाशी संबंध असते तर त्याला कमी शिक्षा झाली असती, असं ख्वाजा आसिफ म्हणाले.


इतर कलाकारांची सुटका


१९९९साली हम साथ साथ है चित्रपटाच्या शूटिंगवेळी काळवीटाची शिकार करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये सलमान खान बरोबरच सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि निलम या अभिनेत्यांविरोधातही खटला चालला. पण या कलाकारांना संशयाचा फायदा मिळाला. या कलाकारांविरोधात सबळ पुरावे नसल्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली.


सलमानची वैद्यकीय चाचणी


जोधपूरच्या जेलमध्ये सलमानला १०६ क्रमांक देण्यात आला आहे. सलमानला वॉर्ड क्रमांक २ मध्ये ठेवण्यात आलं आहे. जेलमध्ये आणल्यावर सलमानच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या. या चाचण्यांमध्ये कोणतेही दोष आढळले नाहीत.


सलमानला व्हीआयपी वागणूक नाही


सलमानला जेलमध्ये आणलं तेव्हा तो निराश होता. सलमानला जेलमध्ये कोणतीही व्हीआयपी वागणूक देण्यात येणार नाही, असं जोधपूरचे डीआयजी विक्रम सिंग यांनी सांगितलं. सलमानला दुसऱ्या कैद्यांप्रमाणेच ठेवलं जाईल. जेलमध्ये चोख सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. सलमानला जेलचे कपडे उद्या देण्यात येणार आहे. सलमानला रात्रीचं जेवण देण्यात आलं पण त्यानं जेवायला नकार दिला, अशी माहिती विक्रम सिंग यांनी दिली आहे. जेलच्या भांड्यांमध्येच सलमानला जेवण देण्यात आलं होतं. सलमाननं जेलमध्ये कोणतीही मागणी केलेली नाही.