सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा, जोधपूर जेलमध्ये रवानगी
जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
जोधपूर : जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. यावेळी शिक्षा ऐकून सलमान खान रडला. पाच वर्षांची शिक्षा झाल्याने त्याला आता अटक झाली असून त्याची थेट जोधपूर जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
दोन्ही बहिणींना रडू कोसळले
सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर सलमानची बहीण अलबिराला रडू आल्याचं सांगण्यात येत आहे. सलमान खानच्या बहिणी त्यांच्या विषयी अधिक भावनिक आहेत. आज सलमानबरोबर बहिणी दिसल्या, पण भाऊ दिसत नव्हते, पण एकूणच सलमान खानला मोठा दिलासा आहे.
निकालाआधी, मी निर्दोष आहे - सलमान
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविले आहे. खटल्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे न्यायालयाने विचारले. त्यावेळी मी निर्दोष आहे, असे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी सलमान भावुक झाला होता. काळवीट शिकार खटला निकालाच्यावेळी सलमानला दोषी ठरविण्यात आले. या प्रकरणात सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे त्याला किमान सहा वर्षांची शिक्षा होऊ शकते.
यांची निर्दोष मुक्तता
दरम्यान, सैफअली खान, सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या कलाकारांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आज सकाळी न्यायालयात पोहोचल्यावर सलमान खानने न्यायालयरूममध्ये न्यायाधीशांसमोर उभे राहून निर्दोष असल्याचे म्हटले. आरोपींपैकी सर्वात आधी सलमान खान न्यायालयात पोहोचला होता.
दरम्यान, न्यायालयाने सलमान खान यानेच काळवीटांची शिकार केल्याचे म्हटलेय. अन्य कलाकार केवळ त्याठिकाणी हजर होते. त्यामुळे सलमानला या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले, तर अन्य कलाकारांना दोषमुक्त करण्यात आले. जोधपूर ग्रामीण जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा निकाल दिला.
कतरिना कैफची प्रार्थना
तर दुसरीकडे सलमानच्या कुटुंबाचा पाठिंबा त्याला कायम असल्याचे दिसून येते. सलमानला पाठिंबा देण्यासाटी त्याच्या दोन्हीही बहिणी अलविरा खान आणि अर्पिता खान शर्मा जोधपूरला पोहोचल्या होत्या. इतकंच नाही तर चक्क अभिनेत्री कतरिना कैफही सलमानच्या बचावासाठी मुंबईत प्रार्थना करण्यासाठी सिद्धीविनायक मंदिरात पोहोचली. तिने सिद्धीविनायकला साकडे घातले.