मुंबई : ईदचा मुहूर्त आणि चित्रपट प्रदर्शनाची तारीख या गोष्टी काही प्रेक्षकांसाठी नव्या नाहीत. ही एक प्रकारची प्रथाच झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही. यंदाही ईदच्या मुहूर्तावर अभिनेता सलमान खान अशाच एका अफलातून रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचं हे रुप प्रेक्षकांमध्ये 'भारत' या नावाने चर्चेत आहे. सलमानच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये 'भारत' नेमका आहे तरी कोण, याची झलक पाहायला मिळत आहे. ठरलेल्या तारखेच्या आधीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेलरची सुरुवात ही सलमानच्याच आवाजात होते. ज्यामधून त्याच्या जन्मापासून ते अगदी म्हातारपणापर्यंचतम आयुष्य नेमकं कसं होतं, याचा अंदाज सहज लावता येतो. सर्कशीत काम करणाऱ्या स्टंटमॅनची भूमिकाही त्याने या चित्रपटात साकारली आहे. त्यामुळे एक भारत आणि त्याची अनेक रुपं चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 



दिशा पटानी आणि कतरिना कैफ यांचीही झलक चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा सलमान आणि कतरिना ही रुपेरी पडद्यावरील चाहत्यांची सर्वाधिक आवडती जोडी आणि त्यांची केमिस्ट्री पुन्हा पाहायला मिळणार आहे. जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोवर हे कलाकारही चित्रपटाच्या ट्रेलरमधून झळकत आहेत. थरार, प्रेम, स्टंरबाजी अशा विविध स्वरुपाची दृश्यं असणारा हा ट्रेलर पाहता 'भारत' यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी परवणी ठरणार असं म्हणायला हरकत नाही. 


'ओड टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या 'भारत'च्या निमित्ताने सलमान कधीही न दिसलेल्या रुपांमध्ये झळकणार आहे. शिवाय ट्रेलरमधील संवाद पाहता आता चित्रपटामध्ये असे अनेक प्रभावी आणि तितकेच तगडे संवादअसणार याचीही चाहत्यांनी अपेक्षा बाळगली आहे. तेव्हा 'भारत' बॉक्स ऑफिसवर ईदच्या निमित्ताने कमाईच्या आकड्यांची गणितं नेमकी कसं बदलणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.