सलमानचा `दबंग ३` चित्रपट वादाच्या भोवऱ्यात
सलमानला भारतीय पुरातन सर्वेक्षण विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.
मुंबई : सलमान खानचा आगामी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'दबंग ३' चित्रपटाची शुटिंग सध्या मध्य प्रदेशमध्ये सुरू आहे. सलमानला भारतीय पुरातन सर्वेक्षण विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील मांडू येथील ऐतिहासिक जल महलात सेट उभारण्यात आले आहे. एएसआयकडून चित्रपटाच्या टीमला सेट काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहे. निर्मात्यांनी जर सेट काढला नाही तर शुटिंग रद्द केले जाईल, अशी तंभी पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये देण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रॉडक्शन हाऊसला याआधी सुध्दा सावध करण्यात आले होते. परंतू चित्रपटाच्या टीमकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. चित्रपटाच्या टीम महलात सेट तयार केले आहे, त्यामुळे प्राचीन स्मारक, पुरातन स्थळ आणि अवशेष कायदा १९५९ च्या नियमांचे उल्लंघन केले आहे.
याशिवाय 'दबंग ३' च्या टीमने नर्मदा नदी जवळ असलेल्या एका मूर्तिला नुकसान पोहोचवले आहे. मध्य प्रदेशातील सांस्कृतीक मंत्री विजयलक्ष्मी साधो यांनी या विषयावर वक्तव्य केले आहे. त्या बोलल्या 'जे काही झाले ते अत्यंत वाईट आहे. मी स्वत: जाऊन परिस्थितीचा आढावा घेईल जर त्यांनी शुटिंग कालावधीत काही हानी केली असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.'
नर्मदा नदीच्या घाटावर 'दबंग 3' चित्रपटाच्या शुटिंगचा नारळ फोडण्यात आला आहे. 'दबंग-3' चित्रपटाच्या आयटम गाण्यावर करिना कपूर खान थिरकताना दिसणार आहे. चित्रपटातील अनेक गोष्टींचा उलघडा हळू-हळू होत आहे. चित्रपटात अभिनेता बॉबी देओल सलमानच्या मित्राच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करणार आहेत. 'दबंग-3' चित्रपट यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.