Lockdown : सलमानचा `राधे` OTT प्लॅटफॉर्मवर लवकरच हेणार प्रदर्शित?
गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटगृह देखील बंद आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलामान खानचा ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे सर्व चित्रपट,मालिकांचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटगृह देखील बंद आहेत. याचा मोठा फटका चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवर पडताना दिसत आहे. त्यामुळे आता सलमानचा 'राधे' चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार अशा चर्चा जोर धरत आहेत. शिवाय चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांनी २५० कोटींची मागणी केल्याचं देखील सांगितलं जात आहे.
परंतु सलमानच्या मॅनेजर जॉर्डी पटेल यांनी सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. बॉलिवूड हंगामाने या बातमीला दुजोरा दिला आहे. 'चित्रपटासंबंधी आम्हाला अशी कोणतीही ऑफर आली नाही आल्यास आम्ही विचार करू. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर राधे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करायचा की नाही याचा निर्णय घेवू.' असं वक्तव्य जॉर्डी पटेल यांनी केलं.
म्हणजे, सलमानचा बहुप्रतिक्षित 'राधे' चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार नसल्याचं याठिकाणी सष्ट होत आहे. सोहेल खान 'राधे' चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तर 'राधे'मधून सलमान आणि प्रभु देवा तिसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. प्रभुदेवा यांनी सलमानच्या 'वॉन्टेड' आणि आगामी 'दबंग ३' चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं आहे.