Samantha Ruth Prabhu on Divorce: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या आपला आगामी चित्रपट 'शकुंतलम'च्या (Shaakuntalam) प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत समांथाने आपल्या घटस्फोटावर स्पष्टपणे भाष्य केलं आहे. Miss Malini ला दिलेल्या मुलाखतीत समांथाने नागा चैतन्यसह (Naga Chaitanya) झालेल्या घटस्फोटाचं कारण आणि तसंच त्यानंतरचा अनुभव शेअर केला आहे. आपण लग्नासाठी 100 टक्के दिले होते, पण काही गोष्टी व्यवस्थित होऊ शकल्या नाहीत अशी खंत यावेळी तिने व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागा चैतन्य आणि आपण वेगळे होत असल्याची घोषणा केल्यानंतर लगेचच आपण पुष्पा चित्रपटातील गाण्याचं शुटिंग सुरु केलं होतं. पण याची आपल्याला कोणतीही खंत नाही असं समांथाने सांगितलं आहे. "जेव्हा मला पुष्पा चित्रपटातील गाण्याची ऑफर मिळाली, तेव्हा माझ्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती," अशी माहिती समांथाने दिली. 


पुढे तिने सांगितलं की "मला वाटलं म्हणून मी ते करत होते. यामध्ये लपवण्यासारखं काही नव्हतं. म्हणजे मी सगळ्यांपासून लपवून ठेवावी अशी कोणतीच गोष्ट केलेली नव्हती. मी लपून बसण्याची आणि सर्व काही ट्रोलिगं, टीका बंद झाल्यानंतर गुन्हा केल्याप्रमाणे हळूच बाहेर येण्याची वाट पाहत बसणार नव्हते. मी तसं काहीच करणार नव्हते. मी माझ्या लग्नासाठी 100 टक्के दिले होते, पण सर्व काही ठरल्याप्रमाणे झालं नाही. पण त्यासाठी मी स्वत:ला त्रास देणार नव्हते. जे मी केलंच नाही त्यासाठी मी स्वत:ला दोष का द्यावा?".


समांथा प्रभू आणि नागा चैतन्य 2017 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. दोघांनी दोन चित्रपटात एकत्र काम केलं आहे. लग्नानंतर चार वर्षातच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण वेगळे होत असल्याचं जाहीर केलं. ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान, नागा चैतन्य सध्या अभिनेत्री शोभिता धुलीपला हिला डेट करत असल्याची चर्चा आहे. 


गतवर्षीसमांथा प्रभू करण जोहरच्या टॉक शो 'कॉफी विथ करण 7' मध्ये आली होती. यावेळी करण जोहरने तिला तिचे आणि नागा चैतन्यचं संबंध मैत्रीपूर्ण आहेत का? अशी विचारणा केली होती. त्यावर तिने म्हटलं होतं की, "म्हणजे तुम्ही आम्हा दोघांना एका खोलीत ठेवले तर धारदार वस्तू लपवाव्या लागतील का? असं विचारत असाल तर होय. भविष्यात कधीतरी ती असू शकते."