उपराष्ट्रपतींकडून कौतुक होत असलेला चित्रपट टॅक्स फ्री
चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
मुंबई : 'पिंक', 'बेबी' अशा एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री तापसी पन्नू आता 'सांड की आंख' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. तिच्या सोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर देखील भूमिका साकारताना दिसणार आहे. उत्तर प्रदेश मधील गावातल्या वृद्ध शार्पशूटर प्रकाशी तोमर आणि चंद्रो तोमर यांच्या खऱ्या आयुष्यावर चित्रपटाची कथा आधारलेली आहे.
महत्वाचं म्हणजे हा चित्रपट राजस्थानमध्ये टॉक्स फ्री करण्यात आला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी 'सांड की आंख' राजस्थानमध्ये टॅक्स फ्री करण्यास मंजुरी दिली आहे. महिला सशक्तिकरण त्याचप्रमाणे खेळावर चित्रपट आधारित असल्यामुळे टॅक्स फ्री करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
याआधी 'सुपर ३०' चित्रपट अनेक राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला होता. 'सांड की आंख' चित्रपटाचे कौतुक देशाचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी देखील केले आहे. तापसी आणि भूमीने त्यांच्यासाठी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनींगचे आयोजन त्यांच्या घरी केले होते.
'सांड की आँख' चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.