Sangeet Natak Academy Award 2024 : दरवर्षीप्रमाणे यंदाही संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा संगीत, नृत्य, रंगभूमी, पारंपारिक संगीत/नृत्य/नाट्य अशा विविध क्षेत्रातील 92 कलाकारांना गौरवण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. काही दिवसांपूर्वी अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संगीत नाटक अकादमीतर्फे 2022-2023 या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यात नाट्य क्षेत्रातील कामगिरीसाठी अशोक सराफ यांना 2022 या वर्षासाठीचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर 2023 या वर्षाचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार अभिनेत्री ऋतुजा बागवेला जाहीर झाला आहे. त्याबरोबरच 2022 या वर्षासाठी शास्त्रीय संगीतामधील अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांना गौरवण्यात येणार आहे. तर 2023 या वर्षासाठी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जाणार आहे. 


ऋतुजा बागवेच्या नावे सर्वाधिक पुरस्कार मिळवल्याच्या विक्रमाची नोंद


अभिनेत्री ऋतुजा बागवेने याबद्दल इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांच्या यादीतील तिच्या नावाचा फोटो शेअर केला आहे. तिने "फारच छान, 'अनन्या' नाटकासाठी आणखी एक पुरस्कार", असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. अनन्या या नाटकात अपघातात दोन्ही हात गमावलेल्या जिद्दी तरुणीची भूमिका तिने साकारली होती. यात तिने दोन्ही हात मागे बांधून दीड दोन तास रंगभूमीवर नाटक सादर केले होते. या नाटकासाठी तिला 12 पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे एकाच भूमिकेसाठी वर्षभरात सर्वाधिक पुरस्कार मिळवल्याचा विक्रमाचीही तिच्या नावे नोंद झाली आहे.  


अशोक सराफ हे गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांची करमणूक करत आहेत. अशोक सराफ यांच्या 'आयत्या घरात घरोबा', 'नवरी मिळे नवऱ्याला', 'माझा पती करोडपती' आणि 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. गेली अनेक दशकं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशोक सराफ यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही काम केले. करण अर्जुन, सिंघम या चित्रपटातही ते झळकले. 


कलापिनी कोमकली, देवकी पंडित यांनाही पुरस्कार जाहीर


दरम्यान प्रसिध्द शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली या शास्त्रीय संगीतातील अलौकिक स्वरतपस्वी पंडित कुमार गंधर्व यांच्या कन्या आहेत. ‘कुमार गंधर्व प्रतिष्ठान’च्या माध्यमातून शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसारासाठीही त्या कार्यरत आहेत. तर गानसरस्वती किशोरी आमोणकर, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्यासारख्या दिग्गज गुरूंकडून संगीताचे धडे घेतलेल्या देवकी पंडित नंबियार या शास्त्रीय गायिका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी सुगम संगीतातही पार्श्वगायिका म्हणूनही नावलौकिक मिळवला आहे.