SSR Case : महेश भट्ट यांची दोन तास कसून चौकशी
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी या जगाचा निरोप घेतला.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी या जगाचा निरोप घेतला. वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून त्याने आत्महत्या केली. त्याने नक्की आत्महत्या का केली. याच शोध सध्या पोलीस घेत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ३७ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आज प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची सांताक्रूझ पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. सुशांतच्या आत्महत्येला एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी हाती काही लागले नसल्यामुळे ही केस पोलिसांऐवजी CBIकडे सोपवण्यात यावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान पोलीस ठाण्यात महेश भट्ट यांची दोन तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान कोणकोणत्या गोष्टींचा उलगडा झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांच्यात चांगली मैत्री आहे. शिवाय रिया कोणत्याही गोष्टीसाठी महेश यांच्याकडून सल्ले घेत असल्याचं वक्तव्य रियाने केलं होतं.
एवढचं नाही तर रिया तिच्या रिलेशनशिप संबंधीत सल्ले देखील महेश भट्ट यांच्याकडून घेत असल्याचं ट्विट महेश भट्ट यांची असिस्टंट सुहरिता दासने केलं होतं. सुशांत आणि रिया रिलेशनशीपमध्ये होते. सुशांतच्या आत्महत्येच्या दोन महिन्यापूर्वी पासून त्यांच्यात मतभेद सुरू असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या.
सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी सतत निगडीत लोकांची चौकशी करण्यात येत आहे. गरज भासल्यास करण जोहरची देखील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.