मुंबई : बॉलिवूडमधील महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या मुंबईतील 'जलसा' या बंगल्याबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. जया बच्चन यांच्या बॉलिवूडसंदर्भातील वक्तव्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला 'जलसा' बाहेर अतिशय चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्याअंतर्गत पाच जवान येथे तैनात करण्यात आले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत ही सुरक्षा व्यवस्था अशीच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या केल्यानंतर त्याप्रकरणीचा तपास सुरु झाला. सर्व बाजूंनी तपास करण्याची सत्र सुरु झाल्यानंतर यामध्ये ड्रग्ज कनेक्शनही समोर आलं. ज्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत हिनं बॉलिवूडमधील माफिया आणि ड्रग्जसंदर्भात काही गौप्यस्फोट केले. बी- टाऊनमधील प्रस्थापितांवर टीकाही केली. 


 


थेट राज्यसभेतही याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून अनेकांनी त्यांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. तर काहींनी मात्र त्यांचा विरोध केला. त्यामुळं सावधगिरी आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता मुंबई पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानि अतिरिक्त सुरक्षा पुरवली आहे.