मुंबई : मालिका विश्वामध्ये साचेबद्ध कथानकांना शह देत एका वेगळ्या धाटणीच्या कथानकाला 'झी मराठी' या वाहिनीवर वाचा फोडण्यात आली. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या माध्यमातून एक वेगळाच थरार आणि रहस्य प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळाली. मालिकेच्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या यशानंतर निर्माते- दिग्दर्शक आणि लेखक- कलाकारांच्या टीमनं पूर्ण तयारीसह मालिकेचं दुसरं पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला आणलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पांडू', 'अण्णा नाईक', 'दत्ता', 'शेवंता' आणि इतर सर्वच पात्र या मालिकेतील कथानकाला अधिक प्रत्ययकारीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरली. याची प्रतिची मालिकेतील हीच पात्र साकारणाऱ्या कलाकारांना मिळणाऱ्या लोकप्रियतेला पाहून आली. याच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. 


'रात्रीस खेळ चाले 2' या मालिकेमध्ये कथानकाची गरज आणि 'शेवंता' या पात्राच्या माध्यमातून उलगडत जाणारं रहस्य पाहता अपूर्वानं ही भूमिका साकारली. अभिनयासोबतच तिनं साकारलेली शेवंता फार कमी वेळातच चाहत्यांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. मुख्य म्हणजे ही भूमिका साकारत असताना खुद्द अपूर्वासुद्धा या मालिकेशी आणि प्रेक्षकांशी जोडली गेली होती. मालिकेनं प्रेक्षकांना निरोप घेतानाच्या क्षणी तीसुद्धआ भावूक झाली. परिणामी एक पोस्ट लिहित तिनं भावनांना वाट मोकळी करुन दिली. 


अपूर्वानं लिहिलं... 


'मालिका समाप्ती ला आली हे समजायला कठीण तर जात आहेतच पण त्याच बरोबरच खूप साऱ्या आठवणींना पूर्णविराम मिळणार आहे. पहिल्या भागाचे गुपित ह्या भागात उलगडणार आहे म्हटल्यावर शेवंता ह्या भूमिकेचे महत्त्व हे वेगळ्या प्रकारची जबाबदारी स्वीकारून मी पुन्हा टीव्ही वर यायचे ठरवले.. जबाबदारी म्हटली की दडपणाखाली असणे साहजिक होते.. पण त्यातून आपली ओळख पुन्हा निर्माण करायची एक सुवर्ण संधी ह्यातून मला दिसली.. आणि त्याला दिलेला प्रतिसाद त्याची पावती देऊन गेला'. 



 


अतिशय सुरेख अशी पोस्ट लिहित भावूक अपूर्वानं तिचा फोटोही पोस्ट केला. ज्यामध्ये तिच्या डोळ्याच्या कडा पाणावल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. थोडक्यात कलाकार म्हणून अपूर्वानं आणि या मालिकेतील कलाकारांनी जो कलेचा रहस्यमयी नजराणा सादर केला त्याला प्रेक्षकांनी दिलेली दाद सारंकाही सांगून गेली हेच खरं.