टी-सीरीजच्या मालकावरील लैंगिक अत्याचाराचे आरोप महिलेने घेतले मागे
#MeToo अभियानांतर्गत सिनेसृष्टीतील अनेक लोकांची नावे समोर आली
मुंबई : टी सिरीजच्या चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमार यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली लैंगिक शोषणाची तक्रार पीडित महिलेनं विनाशर्त मागे घेतलीय. #MeToo अंतर्गत एका महिलेने मुंबईतील ओशिवरा पोलीस स्थानकात भूषण कुमार विरोधात लेखी तक्रार केली होती. पण आता या महिलेने तक्रार मागे घेतल्याची माहिती मिळाली आहे. तीन गाणी गाण्यासाठी अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी भूषण कुमार यांनी आपल्याकडे केल्याची तक्रार या महिलेने केली होती... पण आता मात्र असं काही घडलंच नसल्याचा जबाब महिलेनं पोलिसांसमोर दिलाय. आपली मानसिक स्थिती स्थिर नसल्यानं आपण तक्रार दाखल केली होती, असं महिलेनं म्हटलंय. त्यामुळे भूषण कुमारवरील सर्व आरोप मागे घेण्यात आलेत.
टी-सिरीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमार यांच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी या महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. ओशिवरा पोलीस ठाण्यात याबाबत तिनं तक्रारही दाखल केली होती. आता मात्र, तक्रार मागे घेण्यासाठी तक्रारदार महिलेने पोलिसांना केलेला अर्ज समोर आला आहे.
#MeToo अभियानांतर्गत सिनेसृष्टीतील अनेक लोकांची नावे समोर आली. यामध्ये अनेक दिग्गज मंडळीदेखील असल्याचं स्पष्ट झालं असतानाच एक मोठं नाव या प्रकरणात सहभागी असल्याचं समोर आलं. भूषण कुमार या टी सीरीजच्या मालकावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला होता... २०१८ मध्ये #MeToo या चळवळीने बॉलिवूड हादरवून टाकलं. अनेक दिग्गजांची नावं समोर आल्यामुळे प्रेक्षकांनादेखील मोठा धक्का बसला होता. भूषण कुमार यांच्या विरोधात २०१८ मध्येदेखील एका महिलेनं सोशल मीडिया ट्विटरचा आधार घेत लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यानंतर टी सीरीजच्या कंपनीत काम करणाऱ्या या महिलेने आरोप केल्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद सुरू झाला होता. या दोन्ही महिला एकच आहेत की वेगवेगळ्या याचा मात्र खुलासा अद्याप झालेला नाही. पण आता हे प्रकरण शांत झालं आहे.