नवी दिल्ली : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन' म्हणजेच सीएफसीबीचं काम सिनेमांना सेन्सॉर करणं (सीन्स कापणं) नाही तर त्यांचं वर्गीकरण करण्याचं आहे, असं आझमी यांनी निहलानी यांना सुनावलंय. 


आपल्या 'द ब्लॅक प्रिन्स'च्या प्रिमिअरसाठी त्या दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होत्या. बोर्ड हे सिनेमांच्या सर्टिफिकेशनचं बोर्ड आहे... त्याचं नाव सेन्सॉर बोर्ड नसावं. त्यांना केवळ चित्रपटांचं वर्गिकरण करायचंय. म्हणजेच कोणत्या चित्रपटाला कोणत्या वर्गात (कॅटगरी) टाकलं जावं, हे ठरवण्याचा केवळ त्यांना हक्क आहे. 


इंग्रजांच्या काळातील सर्टिफिकेशन प्रक्रिया
'आपण सध्या ज्या प्रक्रियेचा वापर करतोय ती ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलीय. यामुळे काही लोकांना निवडून बोर्डावर बसवण्यात येत आणि ३०-३५ लोक मिळून ठरवतात की आपल्या सिनेमांत कोणती नैतिकता असावी. यामुळे बोर्डात बऱ्याचदा सद्य सरकारच्या बाजुने झुकणाऱ्या विचारधारेच्या लोकांची वर्णी लागते. मग ते काँग्रेस असो किंवा भाजप... मला वाटतं ही प्रक्रिया योग्य नाही' असंही आझमी यांनी यावेळी म्हटलंय. 
 
बोर्डावर उद्योग क्षेत्रातील लोकांचा समावेश असावा, असं म्हणत असतानाच आझमी यांनी श्याम बेनेगल समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणीही केलीय.