...अन् शाहरुख खान स्टेजवर आलेल्या `त्या` महिलेसमोर नतमस्तक झाला; Video चर्चेत
Shah Rukh Khan Bows Down To Women: एका जाहीर कार्यक्रमामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनाक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्यात.
Shah Rukh Khan Bows Down To Women: 'बॉलिवूडचा किंग खान' अशी ओळख असलेला शाहरुख खानला सुपर स्टार का म्हटलं जातं याचा प्रत्यय आज देशातील अनेक चित्रपटगृहामध्ये येत आहे. शाहरुखचा बहुप्रतिक्षित 'जवान' चित्रपट आज प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहांबाहेरील रांगापासून ते चित्रपटगृहांमधील डान्सपर्यंतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच शाहरुखचा आणखीन एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडीओमध्ये शाहरुख साडी नसलेल्या एका महिलेसमोर नतमस्तक होताना दिसत आहे. शाहरुख अगदी वाकून या महिलेला नमस्कार करुन तिचे आशिर्वाद घेतो.
अनेकांनी वेधून घेतलं लक्ष
आज जवान प्रदर्शित झाला असला तरी मागील अनेक आठवड्यांपासून तो या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. शाहरुख चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 30 ऑगस्ट रोजी चेन्नईला गेला होता. त्याने या कार्यक्रमामध्ये जिंदा बंदा गाण्यावर डान्सही केला. चाहत्यांना चित्रपट पाहण्याचं आवाहन करतानाच त्याने चाहत्यांचं मनोरंजनही केलं. याच कार्यक्रमामध्ये घडलेल्या एका घटनेनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
तो व्हिडीओ झाला व्हायरल
झालं असं की, चित्रपटाचा दिग्दर्शक अटली कुमार त्याच्या आईला घेऊन स्टेजवर शाहरुखची भेट घालून देण्यासाठी आला. पिस्ता रंगाची साडी, मरुन रंगाचा ब्लाउज, केसात गजरा अशा लूकमधील अटलीची आई स्टेजकडे पाठ करुन उभी होती. अटलीची आई स्टेजवर येताचा शाहरुखने त्यांना वाकून नमस्कार केला. त्या जवळ आल्यानंतर शाहरुख अगदी विनम्रपणे पाया पडतात त्याप्रमाणे वाकला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले. शाहरुखच्या या कृतीने त्या भारावून गेल्या. शाहरुखच्या या कृतीसाठी चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला असून या सर्व घटनाक्रमाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
तिकीट विक्रीचा विक्रम
शाहरुख खानच्या या चित्रपटाने तिकीट विक्रीचे अनेक विक्रम मोडल्याचंही तरण आदर्श या चित्रपट समीक्षकाने म्हटलं आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच्या दिवशीच म्हणजेच बुधवारी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत पीव्हीआर-आयनॉक्सने 'जवान'ची 4 लाख 48 हजार तिकीटं विकली. तर सिनेपोलीसने 1 लाख 9 हजार तिकीटं विकली. एकूण 5 लाख 57 हजार चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच विकली गेली. 'पठाण'शी तुलना केल्यास ही विक्री अधिक आहे. 'पठाण'ची 5 लाख 57 हजार तिकीटं विकली गेली होती.
तगडी स्टारकास्ट
शाहरुखबरोबर या चित्रपटामध्ये अभिनेत्री नयनतारा, प्रिया मणी, सानया मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर यासारखी तगडी स्टारकास्ट आहे.