शाहरुख खानने शेतकऱ्यांविषयी केले असे वक्तव्य
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याने नुकतीच सत्यमेव जयते आणि पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला रविवारी हजेरी लावली.
पुणे: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याने नुकतीच सत्यमेव जयते आणि पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला रविवारी हजेरी लावली.
त्यावेळी तो मनमोकळेपणाने शेतकऱ्यांविषयी बोलत होता. ‘शेतकरी हे खरे देशाचे हिरो आहेत. उन्हातान्हात, पावसाळ्यात शेतात कष्ट करतात. एकोपा हीच त्यांची मोठी शक्ती आहे असा शेतकऱ्यांप्रती त्याने विश्वास व्यक्त केला. मनात आणले, तर शेतकरी पाणीदेखील पिकवतील,असेही त्याने सांगितले.
या कार्यक्रमाला अभिनय क्षेत्रासोबतच सामाजिक, वैद्यकीय, व्यवसाय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी त्याने पाणी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या सुरु असलेल्या लढ्याचे कौतुक केले.
‘मला मराठीतील, ‘गतिरोधक पुढे आहे,’ एवढेच वाक्य येते. परंतु, शेतकऱ्यांचे काम पाहता गतिरोधक पुढे नाही, याची जाणीव झाली,’ असेही शाहरुख याने सांगितले. विचार कितीही मोठा असला, तरी त्यामागे मेहनत नसेल, तर त्याला काही अर्थ नसतो, असे शाहरुखने या वेळी सांगितले.
यावेळी उपस्थित नीता अंबानी यांनी मराठीतून उपस्थितांशी संवाद साधला. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह, पोपटराव पवार, डॉ. अविनाश पोळ आदींनीही आपले विचार मांडले. जितेंद्र जोशी, सोनाली कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे आपल्या खास शैलीत सूत्रसंचालन केले.