`कपिल शर्मा शो अश्लील, घाणेरडा` असं म्हणाले अन् नंतर त्याच सहभागी झाले `तारक मेहता`; कारण...
Shailesh Lodha On Kapil Sharma Show: कपिल शर्मा शोवर एकेकाळी टीका करताना शैलेश लोढा यांनी कठोर शब्दांमध्ये समाचार घेतला होता.
Shailesh Lodha On Kapil Sharma Show: छोट्या पडद्यावरील सर्वात प्रतिभावान कलाकारांपैकी एक म्हणजे शैलेश लोढा! अभिनय असो, सूत्रसंचालन असो किंवा अगदी कविता सादर करणं असो सर्व काही शैलेश लोढा यांना सहज शक्य आहे असं वाटतं. शैलेश खरं तर कोणत्याही भूमिकेत अगदी लगेच फिट बसतात. शैलेश हे उत्तम कवी सुद्धा आहेत. दिर्घकाळ चालेल्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेमध्ये तारक मेहताच्या भूमिकेमधून शैलेश लोढा घराघरात पोहोचले.
स्पष्ट केली भूमिका
मध्यंतरी शैलेश लोढा 'द कपिल शर्मा शो'मध्ये सहभागी झाले होते. मात्र त्यांच्या एका जुन्या व्हिडीओ क्लिपमध्ये त्यांनीच 'द कपिल शर्मा शो'वर केलेली टीका व्हायरल झाली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शैलेश लोढा यांनी 'द कपिल शर्मा शो'वर टीका केली होती. या हा शो अश्लील आणि घाणेरडा असल्याची टीका शैलेश लोढा यांनी केली होती. आता याच वादासंदर्भात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शैलेश लोढांनी आपली बाजू मांडली आहे. एकीकडे या कार्यक्रमाला अश्लील आणि घाणेरडा म्हटल्यानंतर त्या शोमध्येच हजेरी का लावली याबद्दल शैलेश लोढांनी सविस्तर माहिती देताना आपली भूमिका स्पष्ट केली.
मी अशा कॅमेडीशी सहमत नाही जिथे...
शैलेश लोढा हे मागील वर्षी 'द कपिल शर्मा शो'मध्ये सहभागी झाले होते. मुलाखतीमध्ये त्यांना या कार्यक्रमात हजेरी लावण्यासंदर्भात विचारण्यात आलं. तसेच या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर तुमच्याच एका जुन्या विधानावरुन तुम्हाला ट्रोल करण्यात आला असा संदर्भही देण्यात आला. या कार्यक्रमामध्ये पाहुणा म्हणून सहभागी झाल्याबद्दल बोलताना शैलेश यांनी, "मी आणि कपिलने एकत्र काम केलं आहे. 2012 मध्ये सिंगापूरमधील एका कार्यक्रमात आम्ही एकत्र काम केलं होतं. या कार्यक्रमाचं नाव 'कॉमेडी नाइट्स कपिल अॅण्ड शैलेश' असं होतं. त्यावेळेस माझं म्हणणं असं होतं की आजी, आत्या यासारख्या व्यक्ती आलेल्या पाहुण्यांशी फर्ल्ट करणारं आपल्या संस्कृतीला शोभण्यासाठी नाही. मी आजही माझ्या या भूमिकेवर कायम आहे. मी अशा कॅमेडीशी सहमत नाही. मला हे पटत नाही. मात्र त्याचा अर्थ असा मी त्या कार्यक्रमामध्ये कधीच सहभागी होणार नाही आणि जगाला मी काय काम करतोय हे सांगणार नाही, असा होतो का? मी त्याच्या कार्यक्रमामध्ये गेलो आणि हिंदीमधील एक कविता सादर करुन दाखवली होती. मी जेव्हा माझी 'मां' नावाची कविता सादर केली होती तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी होतं. माझ्याबरोबर त्यावेळेस माझ्या कविताची ताकदही या कार्यक्रमाला उपस्थित होती. एका कलाकार आणि मित्र म्हणून कपिल फार उत्तम आहे," असं शैलेश लोढा म्हणाले.
देश रिल्स आणि पतली कमरियामध्ये अडकला आहे
शैलेश लोढा यांना मनोरंजन सृष्टीसंदर्भात इतरही अनेक प्रश्न विचारण्यात आले. यापैकी प्रमुख प्रश्न म्हणजे मनोरंजनाच्या नावाखाली पुरुषांना महिलांचे कपडे घालून स्कीट करण्यास सांगितलं जातं किंवा इतरांच्या पत्नीसंदर्भात विधानं करण्यास सांगितलं जातं याबद्दल विचारलं. या प्रश्नावर शैलेश लोढा यांनी, "दुर्देवाने आपल्या देशात ही गोष्ट स्वीकारायला हवी की आपण अशावेळी सुमार दर्जाचं काम करत आहोत. तुम्ही जर बुद्धीमान व्यक्ती होण्याचा प्रयत्न केला तर कोणालाच तुम्हाला पाहण्यात आणि ऐकण्यात रस नसेल. लोक तुम्हाला पसंत करणार नाहीत. देशभरामध्ये रिल्सच्या माध्यमातून आनंद घेतला जात आहे. पतली कमरियावर नाचत आनंद घेणारे वाढले आहेत. 90 टक्के गर्दी सध्या हेच करत आहे," असं उत्तर दिलं.