`आम्ही कार्यक्रमात बनावट चेक देतो`, `शार्क टँक इंडिया`चे अमित जैन असं का म्हणाले?
‘शार्क टँक इंडिया’ हा शो तुम्ही सोनी टेलिव्हिजन आणि सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
Shark Tank India Fake Cheque : शार्क टँक इंडिया या कार्यक्रमाचे तिसरे पर्व चांगलेच गाजले. सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी या कार्यक्रमाचा यंदाच्या पर्वाचा पहिला भाग प्रदर्शित झाला. या कार्यक्रमाचे अनेक भाग हे सुपरहिट झाले. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन पर्वाप्रमाणेच हे पर्वही चांगलेच गाजले. पण आता या कार्यक्रमातील शार्क अमित जैन यांनी या कार्यक्रमातील पैशांशी निगडीत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
‘शार्क टँक इंडिया’मध्ये नवनवे फाऊंडर्स त्यांच्या व्यवसायासाठी फंडिंग गोळा करण्यासाठी येतात. या कार्यक्रमात शार्क हे त्यांना विविध प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्या प्रकल्पात गुंतवणूक करायची की नाही, याबद्दलचा निर्णय घेतात. जर एखाद्या शार्कला त्या व्यवसायात गुंतवणूक करायची असेल, तर तो त्या फाऊंडर्सला ठराविक रक्कमेचा चेक देतो आणि डील झाल्याचे जाहीर करतो. पण आता अमित जैन यांनी या चेकबद्दल एक खुलासा केला आहे.
अमित जैन नेमकं काय म्हणाले?
"आम्ही शार्क टँक इंडियामध्ये नव्या उद्योजकांना जो चेक देतो, तो बनावट असतो. आम्ही दिलेला हा चेक फक्त कॅमेरासमोर दाखवण्यासाठी असतो. या चेकवर शार्कची नावे आणि आमच्या कंपनीचे लोगो असले तरीही हे चेक आमच्या अकाऊंटशी लिंक नसतात. तसेच त्यावर लिहिण्यात आलेला अकाऊंट नंबरही चुकीचा आहे. आम्ही एखाद्या नव्या उद्योजकांसोबत डील करत आहे, हे प्रेक्षकांना दाखवण्यासाठी बनावट चेकचा वापर केला जातो", असे अमित जैन म्हणाले.
यापुढे ते म्हणाले, या कार्यक्रमात बनावट चेकचा वापर करण्यात आला असला, तरी यादरम्यान केला जाणार व्यवसाय हा पूर्णपणे खरा असतो. आम्ही त्या संबंधित व्यवसायाची निगडीत असलेली माहिती बरोबर आहे की नाही, याची पडताळणी करतो. या पडताळणीनंतर नवीन उद्योजक आणि शार्क यांच्यात एक करार होतो. या करारावर सही झाल्यानंतरच शार्ककडून चेक दिला जातो. या सर्व प्रक्रियेनंतरच ही डील पूर्ण होते.
दरम्यान याआधी ‘शादी.कॉम’ व ‘पीपल्स ग्रुप’चे सीइओ अनुपम मित्तल यांनीही ‘मिंट’शी संवाद साधताना असाच काहीसा अनुभव शेअर केला होता. अनुपम म्हणाले, “प्राथमिक गुंतवणूक केल्यावरही 90 टक्के डील्स पूर्णत्वास येत नाहीत. यासाठी सर्वस्वी त्या कंपनीचे फाऊंडर्सच कारणीभूत असतात. त्यांना वाटतं की त्यांच्या कंपनीला बाहेर आणखी जास्त वॅल्यूएशन मिळेल. आम्ही जर 20 डील्स करत असू तर त्यापैकी 10 डील्सच पूर्ण होतात.” ‘शार्क टँक इंडिया’ हा शो तुम्ही सोनी टेलिव्हिजन आणि सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.