मुंबई : मंगळवारी मुंबईच्या सांताक्रूझ येथील स्मशान भूमीत दिग्गज अभिनेते शशी कपूर शेवटचा निरोप देण्यात आला. शशी कपूर केल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. 


राष्ट्रध्वजात पार्थिव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथे शशी कपूर यांच्या पार्थिवाला राष्ट्रध्वजात गुंडाळून आणण्यात आले. एएनआयनुसार, मुंबई पोलिसांनी शशी कपूर यांना ३ बंदुकांच्या सलामीने निरोप दिला. त्यांचं सोमवारी मुंबईमध्ये दीर्घ आजाराने निधन झालं. 



अंत्यसंस्काराला दिग्गजांची उपस्थिती


आज मुंबईत त्यांच्या अंतिम संस्कारासाठी बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन, सलीम खान, शाहरूख खान, सलमान खान, आमिर खान, अनिल कपूर, ऋषी कपूर, रणधीर कपूर, संजय दत्त, सैफ अली खान, रणबीर कपूर, नसीरूद्दीन शाह, नवाजुद्दीन सिद्दीकी, सुप्रिया पाठक, शक्ती कपूर आणि सुरेश ओबेराय यांच्यासह अनेकांनी उपस्थिती लावली. 




पहिला सिनेमा


पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा आणि राज कपूर-शम्मी कपूर यांचे लहान भाऊ शशी कपूर यांनी बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर १९६१ मध्ये ‘धर्मपुत्र’ या सिनेमाने बॉलिवूडमध्ये सुरूवात केली होती. 


त्यांना मिळालेले पुरस्कार


शशी कपूर यांना २०११ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर २०१५ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला होता. 


ब्रिटीश अभिनेत्रीसोबत लग्न


ब्रिटीश अभिनेत्री जेनिफर केंडरसोबत त्यांनी लग्न केलं होतं. जेनिफरचं १९८४ मध्ये निधन झालं. शशी कपूर यांना एक मुलगी संजना कपूर आणि दोन मुलं कुणाल-करण कपूर हे आहेत. 


कारकिर्द


शशी कपूर यांनी बालकलाकार म्हणून सिनेमांमध्ये काम सुरू केलं होतं. त्यानंतर त्यांनी हिरो म्हणून १९६१ साली आलेल्या ‘धर्मपुत्र’पासून सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी १५० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये कामे केली. त्यांचं खरं नाव बलबीर असं होतं.