Shatrughan Sinha On Sonakshi Sinha Wedding Day: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आपला प्रियकर झहीर इक्बालसह (Zaheer Iqbal) विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. दोघांच्या लग्नाची पत्रिकाही ऑनलाइन लीक झाली आहे. पण दोघांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दुसरीकडे सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी आपल्याला या लग्नाबद्दल काहीच माहिती नसल्याचं सांगत कुटुंबात सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत दिले होते. पण आता त्यांनी आणखी एक विधान केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शत्रुघ्न सिन्हा यांनी आपण लग्नाच्या वृत्ताला ना दुजोरा देत आहे, ना त्या नाकारत आहे असं स्पष्ट केलं आहे. पण जर हे वृत्त खरं असेल तर आपण एक आनंदी बाप असू असंही म्हटलं आहे. तिने कोणाशीही लग्न केलं तरी कुटुंब तिच्या निर्णयाचं समर्थन करेल असं शत्रुघ्न सिन्हा यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. "मी ना त्यांच्या लग्नाच्या वृत्ताल दुजोरा देत आहे, ना त्याचं खंडन करत आहे. माझा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम असेल," असं शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं आहे. 


"मी एक अभिमानी बाप आहे"


शत्रुघ्न सिन्हा यांनी पुढे सांगितलं की, "सोनाक्षी माझी एकुलती एक मुलगी असून, माझ्या फार जवळ आहे. मला तिला वडील असल्याचा फार अभिमान आहे. कारण गेल्या काही वर्षात तिने अभिनेत्री म्हणून चांगली प्रगती केली आहे. 'लुटेरे'पासून ते आता 'हिरामंडी'पर्यंत तिने स्वत:ला एक उत्तम अभिनेत्री म्हणून सिद्ध केलं आहे".


"जर माझी मुलगी लग्न करत असेल तर मी तिला आशीर्वाद देईन. तसंच तिच्या निर्णयाचं समर्थन करेन. सोनाक्षीला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. तिच्या लग्नात मी जगातील सर्वात आनंदी बाप असेन," अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.


"आजकालची मुलं आई-वडिलांना काही सांगत नाहीत"


"मी नेहमीच तिच्या भल्याचा विचार करत सदिच्छा देईन. एकच तर मुलगी आहे मला," असंही ते म्हणाले. दरम्यान या मुलाखतीत त्यांनी आपल्याला लग्नाबद्दल काहीच कल्पना नव्हती हे मान्य केलं. "माझे जवळचे लोक मला तुम्हाला या कथित लग्नाबद्दल माहिती का नव्हतं? आणि मीडियाला कसं माहिती होतं? अशी विचारणा करत आहेत. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की, आजकालची मुलं आई-वडिलांकडून परवानगी घेत नाहीत. फक्त माहिती देतात. आम्ही आम्हाला सूचना मिळण्याची वाट पाहत आहोत". रिपोर्टनुसार, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल 23 जूनला विवाहबंधनात अडकणार आहेत.