अभिनेता शंतनू मोघे पुन्हा एकदा साकारणार चरित्र भूमिका
नवीन भूमिकेत शंतनू मोघे
मुंबई : तरुण आणि दमदार कलाकारांच्या यादीत अभिनेता शंतनू मोघे यांचं नाव आग्रहाने घेता येईल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेनंतर अभिनेता शंतनू मोघे प्रेक्षकांना पुन्हा एकदा चरित्र भूमिका साकारताना दिसणार आहे. विप्र एंटरटेनमेंट आणि दिशादिपा फिल्म्स निर्मित ''श्री राम समर्थ'' सिनेमात शंतनू मोघे यांनी समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेत दिसणार आहे.
येत्या १ नोव्हेंबर २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या सिनेमात त्याची मुख्य भूमिका आहे. मनाच्या श्लोकांचे रचयिते इतकीच त्यांची ओळख नसून त्यांनी रोवलेली आदर्शांची आणि मार्गदर्शनाची मुहूतमेढ आजही तितकीच महत्त्वपूर्ण ठरते. अफाट ज्ञान आणि रामरायाच्या भक्तीत आकंठ बुडून प्राप्त केलेली सिद्धी संत रामदास स्वामींच्या ठायी पाहायला मिळते. स्त्रियांचा आदर आणि महिला सबलीकरणाचे याचे समर्थ खरेखुरे पुरस्कर्ते होते हे देखील सिनेमात दाखविण्यात आले आहे.
या सिनेमाचे दिग्दर्शन संतोष तोडणकर यांनी केलं आहे. श्री राम समर्थ सिनेमातील भूमिकेबद्ल शंतनू म्हणाला, हा सिनेमा रामदास स्वामींच्या चरित्रपटापेक्षा समाजातील सद्य परिस्थितीचे नेमके आणि मार्मिक वर्णन करणारा आहे. सिनेमात दाखविलेल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना उत्तम प्रशासन आणि प्रशासक कसे असावे याबद्दल नेमकं भाष्य करतो. यासिनेमाच्या निमित्ताने समर्थांच्या संदर्भातील बऱ्याच गोष्टी नव्याने समजल्या. छत्रपतींसारखे भरजरी परिधान ते समर्थांची भगवी वस्त्र अशा ३६० अंशाच्या कोनात भूमिका आणि अभिनय करताना खूप समाधान वाटलं. रंजक तसेच उदबोधक आणि प्रेरणादायी सिनेमा संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्याची उत्तम संधी येत्या १ नोव्हेंबर पासून प्रेक्षकांना मिळणार आहे.