....म्हणून कुणाल कामरानं घेतली संजय राऊतांची भेट
`Shut up ya Kunal`
मुंबई : मागील काही दिवसांपासून बहुविध कारणांनी चर्चेत असणाऱ्या संजय राऊत यांनी पुन्हा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पण, यावेळी चर्चेस कारण ठरत आहे ते म्हणजे त्यांची मुलाखत.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा राजकीय वर्तुळात शिवसेना शैलीत शाब्दीक फटकेबाजी करणाऱ्या संजय राऊत यांची मुलाखत घेणार आहे. ज्या निमित्तानं कुणालनं नुकतीच राऊतांची भेटही घेतली. 'Shut up ya Kunal 2.0', असं कॅप्शन लिहित खुद्द कुणाल कामरा यानंच या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
कुणाल कामरा याच्या स्टँडअप कॉमेडी सीरिजचं दुसरं पर्व लवकरच सुरू होणार आहे. या सीरिजच्या सुरवातीलाच शिवसेना नेते संजय राऊत यांची मुलाखत कुणाल कामरा घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. या कारणासाठीच त्यानं ही भेट घेतल्याची माहीती मिळत आहे.
कुणालनं यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि प्रसिद्ध संपादक रविश कुमार यांचीही मुलाखत घेतली आहे. आपल्या चौकटीबाहेरील आणि विशेषत: राजकीय परिस्थिवर उपरोधिक टीका करत भाष्य करत विनोद सादर करण्याची त्याची शैली विशेष चर्चेचा मुद्दा ठरते.
मुख्य म्हणजे आता शिवसेना नेते संजय राऊत यांची मुलाखत किती घेताना कुणाल कामरा त्यांची किती फिरकी घेणार आणि संजय राऊत त्याच्या या प्रश्नांना शिवसेना स्टाईलनं कशी उत्तरं देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.