मुंबई :  अभिनेता सलमान खानच्या बाबत एक धक्कादायक बातमी समोर येतेय. लॉरेन्स बिश्नोई टोळीने पनवेलमध्ये सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याची योजना आखली होती.  त्यासाठी पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र पुरवठादाराकडून शस्त्रे खरेदी करण्याची योजनाही होती. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवून चार जणांना अटक केली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात असलेला आरोपी बिश्नोई, त्याचा कॅनडास्थित चुलत भाऊ अनमोल बिश्नोई आणि सहकारी गोल्डी ब्रार याने पाकिस्तानातील एका शस्त्रास्त्र विक्रेत्याकडून एके-47, एम-16 आणि इतर अत्याधुनिक शस्त्रे खरेदी केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांचा वापर करून अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचला गेला होता. अशी माहिती समोर येतेय.समोर आलेल्या माहितीनुसार, या प्लॅनमध्ये त्यांचा उद्देश सलमान खानची गाडी थांबवून त्याच्यावर हल्ला किंवा फार्महाऊसवर हल्ला करणं हा होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक होण्याच्या एक महिन्यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळी तयार झाल्याचंही समोर आलं आहे. नवी मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे की, गुप्तचर माहितीच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक केली असून, अभिनेता सलमान खानवर हल्ला करण्याच्या योजनेचा तपास सुरू आहे. 14 एप्रिल रोजी मुंबईतील वांद्रे भागातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घराबाहेर मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. या हल्ल्याची सुपारी लॉरेन्स बिश्नोईने घेतली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक केली.सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा कट ऑक्टोबर 2023 मध्ये रचण्यात आल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला तपासादरम्यान मिळाली होती. सूत्रांनुसार, शूटर विकी गुप्ता आणि सागर पाल यांनी पनवेलमध्ये भाड्याने घरही घेतलं होतं.


त्यांनी येथे दुचाकी घेतली होती.  काही दिवसांनंतर दोन्ही शूटर्सना पिस्तुले देण्यात आली. त्याने सलमान खानच्या अपार्टमेंटची रेकी केली. या प्रकरणातील एक आरोपी अनुज थापन याचा पोलीस कोठडीत १ मे रोजी मृत्यू झाला होता. आरोपीने चादरीने गळफास लावून घेतला होता. अनुज थापनच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. अलीकडेच लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या एका सदस्याला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. मोहम्मद रफिक चौधरी (३७) असे आरोपीचे नाव आहे. गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेला तो पाचवा आरोपी आहे.