सख्खा भाऊ, पक्का वैरी; सेलिब्रिटी बहिणीचं आयुष्य संपवूनही `तो` आज मोकाट कसा?
त्यानं गुन्हा स्वीकारूनही का झाली सुटका.... पाहा या घटनेनं का माजलीये इतकी खळबळ
मुंबई : काही वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या वर्तुळात कमालीची प्रसिद्धीझोतात आलेली आणि गाजणारी सेलिब्रिटी अचानकच काळाच्या पडद्याआड गेल्याची बातमी आली. या सेलिब्रिटीचं नाव होतं, कंदील बलोच (Social Media Star Qandeel Baloch) .
कंदील बलोच हिच्या हत्येची बरीच चर्चा झाली. या साऱ्यासाठी तिच्या भावाला दोषी ठरवण्यात आलं होतं.
वसीम बलोच (Waseem Baloch) या तिच्या भावाला यासाठी ऑनर किलिंग (Honor Killing) च्या गुन्ह्याअंतर्गत आजीवन कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली होती. पण, तो शिक्षा संपण्याआधीच बाहेर आला आहे.
धक्कादायक बाब अशी, की वसिमनं स्वत:च बहिणीला संपवल्याचा गुन्हा कबूल केला होता. याचा आपल्याला कोणताही पश्चाताच झाला नसल्याचंही तो म्हणाला होता.
इतक्या खळबळजनक वक्तव्यांनंतरही तो कारागृहातून बाहेर आला ही बाब अनेकांना हादरवणारी ठरत आहे.
का होता बहिणीचा राग?
CNN च्या वृत्तानुसार वसिमच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला मुल्तान शहर न्यायालयातून सुटकेचा दिलासा देण्यात आला. अद्यापही न्यायालयानं हा निर्णय जाहीर केलेला नाही.
मोहम्मद वसिम याने 25 वर्षीय कंदील बलोच हिचा 2016 मध्ये गळा घोटून जीव घेतला होता. बोल्ड अंदाज आणि पितृसत्ताक समाजाविरोधात जाणं त्याला संताप आणणारं ठरलं होतं.
बहिणीचा जीव घेतल्याप्रकरणी वसिमला घटनेनंतर सातव्या दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण, त्याला या कृत्याचा पश्चाताप नव्हता. त्यावेळी पाकिस्तानमध्ये एक कायदा लागू होता. ज्याअंतर्गत पीडितेचं कुटुंब गुन्हेगाराला क्षमा करु शकतं.
याअंतर्गत ज्यावेळी सदर प्रकरणाचा खटला सुरु होता, तेव्हा कंदीलच्या आई- वडिलांनी एक शपथपत्र दाखल करत आपण मुलीचं आयुष्य संपवणाऱ्याला क्षमा केलं असल्याचं स्वीकारलं होतं. परिणामी हे प्रकरण तिथंच निकाली निघालं.