मुंबई : 'चॉकलेट बॉय' म्हणून संपूर्ण सिनेसृष्टीत लोकप्रियता मिळवलेले अभिनेता ऋषी कपूर यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. ऋषी कपूर यांच्यावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. २०१८ मध्ये ऋषी कपूर यांना कर्करोग झाल्याचे निधान झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर परदेशात उपचार सुरू होते. यादरम्यानच्या काळात त्यांनी चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. सप्टेंबर २०१९ मध्ये ऋषी कपूर भारतात परतले. मात्र आज त्यांची प्राणज्योत माळवली. तीन वर्षांपूर्वी ऋषी कपूर यांचे सोशल मीडियावरील शब्द अखेर आज खरे ठरले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषी कपूर यांनी तीन वर्षांपूर्वी संतापाच्या भरात काढलेले उद्गार आज खरे ठरणार आहेत. तीन वर्षांपूर्वी २७ एप्रिल २०१७ रोजी दिग्गज अभिनेता विनोद खन्ना यांचे कॅन्सरमुळे निधन झाले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नव्या पिढीतील एकही कलाकार उपस्थित राहिला नव्हता. यावर ऋषी कपूर यांनी २८एप्रिल २०१७ रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला होता. 



'लजास्पद आहे हे. विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्कारात या पिढीतील एकही कलाकार सहभागी झाला नाही. त्यांच्याबरोबर काम केलेले कलाकारही आले नाही. जेव्हा माझं निधन होईल, तेव्हा माझ्या मनाची तयारी असलीच पाहिजे. कोणीही मला खांदा देऊ नये. आजच्या तथाकथित स्टार्सचा खूप राग आला आहे', असं ऋषी कपूर यांनी चिडून ट्विट केलं होतं. 



आज त्यांचे तीन वर्षांपूर्वीचे शब्द अखेर खरे ठरणार आहेत. लॉकडाऊनमुळे इच्छा असूनही आज कलाकारांनी ऋषी कपूर यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होता येणार नाही. खूपच मोजक्या व्यक्तींना त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. 


ऋषी कपूर यांनी दिवंगत अभिनेता विनोद खन्ना यांच्या अंत्यदर्शनाबाबत व्यक्त केलेल्या संतापावेळी त्यांना कॅन्सरची लागणही झाली नव्हती. आज त्यांच्या मनात असा विचारही नसेल पण क्रोधाच्या भरात व्यक्त केलेली भावना आज खरी ठरली.